बोरीत ज्येष्ठ नागरिकावर हल्ला; नगरपरिषद प्रशासनाचा ढिसाळ कारभार
| उरण | प्रतिनिधी |
उरण शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या ढिसाळ आणि बेफिकीर कारभारामुळे मोकाट कुत्र्यांची दहशत वाढत चालली आहे. त्याचा फटका थेट सामान्य नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे.
बोरी गावातील विजय मांजरेकर उर्फ विजू (72) यांच्यावर रविवारी (दि.25) सकाळच्या सुमारास मोकाट कुत्र्यांनी अचानक हल्ला करून पायाचा गंभीर चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर डॉ. प्रशांत बोंद्रे यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत त्यांना उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, जखम अत्यंत खोलवर व गंभीर स्वरूपाची असल्याने, प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे, अशी माहिती मिळाली आहे.
या घटनेमुळे बोरीसह आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, संबंधित कुत्रा पिसाळलेला असण्याची दाट शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, याच ठिकाणी जर एखादे लहान मूल किंवा महिला असती, तर मोठा अनर्थ घडला असता. दरम्यान, उरण नगरपरिषदेने घनकचरा व्यवस्थापनासाठी लाखो रुपयांचा खर्च करून ठेकेदार कंपन्यांना काम दिले आहे. तरी प्रत्यक्षात शहरात कचऱ्याचे नियमित संकलन होत नसल्याचे वास्तव वारंवार समोर येत आहे. काही भागांत चारचार दिवस कचरा उचलला जात नाही, तर काही ठिकाणी महिनाभर कचरा तसाच पडून असल्याचे विदारक चित्र नागरिकांना पाहावे लागत आहे. या गंभीर परिस्थितीबाबत स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या असून, पत्रकारांनीही या प्रश्नावर वारंवार वृत्तपत्रांतून ठळक बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र, या सर्व तक्रारी आणि बातम्यांकडे आरोग्य विभागाने सपशेल दुर्लक्ष करून ठेकेदारांना हेतूपुरस्सर पाठीशी घातले जात असल्याचा आरोप संतप्त नागरिकांकडून होत आहे.
