| डोंबिवली | वृत्तसंस्था |
डोंबिवली एमआयडीसीमधील फेज 2 मधील एका केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर धुरांचे मोठे लोट परिसरात पसरले. आगीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. कंपनीजवळ एका वाहनाच्या कंपनीचे शोरुम आहे. या कंपनीपर्यंत ही आग पसरली आहे. सहा ते सात कामगार या आगीत जखमी झाले आहेत. आगीची भीषणाता पाहून उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणे येथून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आहेत. वाढत्या तापमानामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे अवघड झाले आहे.
स्फोट झाल्यानंतर अनेक वस्तू हवेत उडाल्या. आगीची माहिती मिळाल्यावर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ‘डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. 8 जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.