रायगड जिल्ह्यातील नगरपंचायतीत शेकाप-राष्ट्रवादीचे वर्चस्व

पोलादपूरमध्ये शिवसेना तर तळा तालुक्यात राष्ट्रवादीची सत्ता
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील 6 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल आज जाहीर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. पाली, खालापूर, माणगाव, म्हसळा, तळा या पाच नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी आणि शेकापक्षला जनमताचा कौल मिळाला आहे. तर पोलादपूर नगर पंचायतीमध्ये काँग्रेसला धूळ चारत शिवसेनेने विजय मिळवला आहे.नव्याने स्थापित झालेल्या पाली नगरपंचायतीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस 6, शेकाप 4, शिवसेना 4, भाजप 2, अपक्ष 1 असा निकाल लागला आहे. त्यामुळे या नगरपंचायतीत वर्चस्व मिळविणार्‍या राष्ट्रवादी-शेकाप आघाडीचाच नगराध्यक्ष विराजमान होईल, हे स्पष्ट झाले आहे. खालापूर नगरपंचायतीचा निकाल अनपेक्षित असा असला तरी शेकाप 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 तर शिवसेना 8 अशा जागा मिळाल्या असल्याने येथे शेकाप आणि राष्ट्रवादी एकत्र येत सत्ता स्थापन करतील. माणगाव नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागांवर तर शेकापसह इतरांना 2 जागा मिळाल्या तर शिवसेनेला 7 ठिकाणी विजय मिळाला आहे. त्यामुळे इथे राष्ट्रवादी आणि शेकाप एकत्र येत सत्ता हातात घेतील.तळा तालुक्यात सेनेच्या ताब्यातील सत्ता हिसकावत राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा पटकावल्या तर सेनेला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागले.

भाजपचा मात्र इथे चंचु प्रवेश झाला आहे. मात्र सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती तळावासियांनी सोपविली आहे.म्हसळा नगरपंचायतीत 13 जागा प्राप्त करून राष्ट्रवादीने आपली सत्ता कायम राखली आहे. शिवसेनेला 2 तर काँग्रेस पक्ष 2 जागांवर निवडून आला आहे.पोलादपूर नगरपंचायतीमध्ये शिवसेना 10 जागा मिळवून सत्ता राखण्यात यशस्वी झाली आहे. काँग्रेसला 6 तर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रयत्नांची शर्थ करून प्रतिष्ठेची बनविलेल्या या निवडणुकीत अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

Exit mobile version