पक्षी-प्राण्यांसाठी दाना-पाण्याची व्यवस्था

प्राणी मित्र मारुती राणेंची अनोखी भूतदया
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
मार्च, एप्रिल, मे च्या मध्यान्ह उन्हाच्या काहिलीने पक्षी-प्राण्यांच्या दाण्यापाण्याचे हाल होत आहेत. या पशुपक्षांच्या अन्नपाण्याची व्यवस्था करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक प्राणीपक्षी मित्रांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी विविध ठिकाणी अन्नाची व पाण्याची व्यवस्था करीत आहेत. जिल्ह्यातील वरवठने गावच्या मारुती राणे यांचा पशु-पक्षी व प्राण्यांवर असलेला जीव, त्यांच्याशी निर्माण झालेले नाते व प्रेम थक्क करणारे आहे. तळपत्या उन्हात पक्षी-प्राण्यांसाठी दाना-पाण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने पर्यावरण स्नेही व प्राणी मित्र मारुती राणेंची अनोखी भूतदया दिसून येते.


तब्बल 7 वर्षांपासून ऊन, वारा, वादळ व पाऊस या ऋतूत प्राणी व पशुपक्षांच्या अन्न पाण्याची ते नियमीत सोय व व्यवस्था करीत आहेत. राणे या पर्यावरण स्नेही व प्राणी मित्रांनी हे अनोखे व प्रेरणादायी काम हाती घेतले आहे. त्यांच्या या निस्वार्थी व सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. माळरान, किल्ले, गड, जंगल या सर्व ठिकाणी पावसाळ्यात मोठया प्रमाणात छोटी झुडपे व गवत उगवते. परंतु ऑक्टोंबर नंतर वाढत्या उष्म्याने ही झुडप व गवत सुकते आणि अशा माळरान, डोंगर व शेतात सुकेल्या झुडप व गवताला नैसर्गिकरीत्या वणवा लागतो, तर काही लोक कळत-नकळत आग लावतात. या आगीचे रुपांतर प्रचंड नैसर्गिक व कृत्रिम वणव्यात होते. दरवर्षी जिल्ह्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर असे वणवे लागतात. परिणामी या आगीत झाडे-झुडपे, पशू-पक्षी, सु्क्ष्मजीव तसेच सरपटणारे प्राणी यांचा जळून मृत्यु होऊन सजीवसृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. वणवे हिरवीगार वनसंपदा नष्ट करीत आहेत.


याबरोबरच जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक वास्तू आणि किल्ल्यांवरील हे वणवे या ऐतिहासिक वस्तूंना देखील नुकसान पोहचवत आहेत. गवत जळल्याने गवतावर अवलंबुन असणार्या गुरे-ढोरांवर उपासमारीची वेळ येते. मोठ्या प्रमाणात सजिवसृ्ष्टीचे नुकसान होते. अशावेळी जिल्ह्यात मारुती राणे यांच्यासारखे पर्यावरण प्रेमी व प्राणीमित्र पुढे सरसावतात, व प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार असून त्यांना देखील दैनंदिन दानापाणी व भोजन मिळाले पाहिजे या हेतूने आता प्रयत्न होत आहेत, अनेकजण या कार्यात सहभागी होऊ इच्छित आहेत. राणे 2015 पासून साधारणतः 7 वर्षांपासून पशु प्राणी यांच्यासाठी हे सेवाकार्य सुरू आहे. पूर्वी 5 लिटर पाणी आणायचो आता 20 लिटर पाणी आणावे लागते. पशु पक्षी प्राणी यांना फळे, गहू, धान्य नित्यनियमाने घेऊन येतो. पोटच्या मुलांप्रमाणे वानर, माकडे, कुत्री माझ्या येण्याच्या आतुरतेने वाट बघत असतात, त्याच्या गाडीचा हॉर्न वाजवला, आवाज दिला की सारे पशु पक्षी वन्यजिव जवळ येतात. प्राण्यांचा मिळत असलेला सहवास व त्यांची तहान व भूक भागते याचे परमोच्च समाधान व आनंद मिळतो. आता या पशु पक्षी प्राणी यांना त्याची सवय झाली, त्यांनाही त्यांची सवय झाली. सगे सोयरे यांच्यासारखे हे अतूट नाते जुळलेय. पूर्वी प्रतिकूल परिस्थिती होती, एकवेळ जेवणाचे वांदे होते, आज या मुक्या जीवांची सेवा करता येते, मन भरून येतेय. असे पाणावलेल्या डोळ्यांनी राणे म्हणाले.

Exit mobile version