चिटफंड घोटाळ्यातील गुंतवणूकदारांचा आक्रोश
| उरण | वार्ताहर |
उरणमधील चिटफंड घोटाळ्यातील डब्बल नको आपली गुंतवणूक केलेली मुद्दल तरी मिळेल की नाही असा आक्रोश गुंतवणूकदारांचा तालुक्यात सुरू आहे.
हजारो गुंतवणूकदारांनी पिरकोन गावातील सतीश गावंड व कोप्रोली गावातील सुप्रिया पाटील यांच्या आमिषाला बळी पडत गुंतवणूक केलेल्या रकमेच्या डब्बल पैसे मिळतील या आशेवर तालुक्यासह इतर तालुक्यातील अनेकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, काही दिवस गुंतवणूकदारांना डब्बल रक्कम मिळाली होती. त्यामुळे दिवसेंदिवस गुंतवणूकदारांची व रकमेचा आकडा फुगत गेला. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक दोन्ही चिटफंड चालविणाऱ्याकडे जमा झाली. त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ होऊ लागली होती.
याच दरम्यान सतीश गावंड याच अटक करून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी जामिनावर सुटका होताच गुंतवणूकदारांना पैसे मिळण्याची आशा वाटू लागली होती. परंतु, चिटफंड चालविणाऱ्याकडून तारखेवर तारीख मिळू लागली, पण पैसे काही मिळत नव्हते. दरम्यान दुसरे चिटफंड चालविणाऱ्या सुप्रिया पाटील यांना अटक करण्यात आली होती. याचा फायदा घेत सतीश गावंडही फरार झाला. यामुळे गोरगरीब नागरिकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाली.
गुंतवणूकदारांना पैसे मिळवून देण्यासाठी काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी फायदा उठविण्यासाठी त्यांची एकत्रित बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे लवकरच परत मिळवून देऊ, असे आश्वासन दिले होते. तसेच हा विषय विधानसभेच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातदेखील गाजला होता. हे प्रकरण पोलीस यंत्रणेकडून न्याय प्रविष्ट झाले आहे. तसेच चिटफंड चालविणारे सतीश गावंड व सुप्रिया पाटील यांच्यासह त्यांचे काही एजंट जेलची हवा खात आहेत. मात्र, तालुक्यातील गुंतवणूकदार सध्या हैराण झाले आहेत. आता जवळपास जेलमध्ये जाऊन दोघांना वर्ष होण्यास येऊनही काही ठोस कारवाई अथवा पैसे मिळत नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. आता तर डब्बल नको, आमची गुंतवणूक केलेली रक्कम तरी कोणी परत मिळवून देईल का, असा आक्रोश गुंतवणूकदारांचा सुरू आहे.