विकासाचा नावाखाली विनाशाकडे नको; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

वन्यजीव सप्ताह शुभारंभ सोहळा
मुंबई | प्रतिनिधी |

विकासाचा ध्यास घेऊन विनाशाकडे तर जात नाही ना याचा विचार करण्याची गरज आहे , आपल्याला आपले वन आणि वन्यजीव वैभव जपायचे आहेच. त्यासाठी जगा आणि जगू द्या हा मूलमंत्र गाठीशी बांधत पुढं जाऊया असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वन्यजीव सप्ताहाच्या शुभारंभप्रसंगी केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याहून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. तर सह्याद्री अतिथी गृह येथे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी,प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) जी. साई प्रकाश, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी आदि मान्यवर उपस्थित होते.तर राज्यभरातून वन विभागातील अधिकारी ,कर्मचारी,वन्यप्रेमी नागरिक दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

आपण कायदे करतो आणि आपल्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ लावतो. विकासाचे वेडे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कोणता विनाश करत आहोत हे न बघता आज आपण पुढं जात आहोत. वन, वन्यजीव आणि पर्यावरणाप्रती लोकांमध्ये जशी जनजागृती झालीच पाहिजे तशीच ती राजकीय नेत्यांमध्येही झाली पाहिजे.
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने वनप्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. वनांचे, वन्यप्राण्याचं महत्व सगळ्यांना, विशेष करुन लहान मुलांना, भावी पिढीला कळावे, हा प्रयत्न आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून वनांचं, वन्यप्राण्यांचे अस्तित्व, जगासाठी, माणसांसाठी किती महत्वाचं आहे, हे समजवण्यात आपल्याला यश मिळेल, वन्यप्राणी संरक्षणाच्या चळवळीला बळ मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

Exit mobile version