पैशासाठी नको, देशासाठी खेळा!

कपिल देव यांच्या खेळाडूंना कानपिचक्या

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

प्रत्येकाला पैसा हवाय, परंतु आयपीएलपेक्षा देशासाठी खेळणे महत्त्वाचे आहे, अशा शब्दात भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी खेळाडूंना कानपिचक्या दिल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेट संघाचं प्रदर्शन अत्यंत सुमार दर्जाचं राहिलं आहे. भारताला अनेक कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय टी-20 मालिकेतही पराभवाची चव चाखावी लागली आहेत. भारतीय संघाच्या सुमार कामगिरीवर बोट ठेवत त्यांनी मार्गदर्शनही केले.

भारतीय संघाच्या कामगिरीनंतर कर्णधार आणि प्रशिक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अशातच कसोटी आणि टी-20 साठी वेगळे प्रशिक्षक असावेत का? अशी चर्चाही क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. यावर कपिल देव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “दोन प्रशिक्षक असावे की नाही हे मला माहिती नाही. मी याचे स्पष्ट उत्तर देऊ शकत नाही. अशा गोष्टींबाबत नीट विचार करावा लागतो. भारतीय क्रिकेटसाठी जे चांगले, तेच करायला हवे”. पुढे बोलताना ते म्हणाले, टी-20 लीगच्या वाढत्या आकर्षणामुळे खेळाडू राष्ट्रीय संघापेक्षा फ्रँचायझीला प्राधान्य देत आहेत. सगळ्यांना पैसा आवडतो, पण काहींसाठी तो अतिशय महत्त्वाचा असतो. माझ्या मते भारतासाठी खेळणे हे आयपीएलपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. पण प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. त्यांना शुभेच्छा,” असेही त्यांनी सांगितलं.

Exit mobile version