आम्हाला अडवू नका, अन्यथा फोडून काढू – राकेश टिकैत

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
केंद्राच्या तीन शेती कायद्यांना विरोध करणार्‍या संयुक्त किसान मोर्चाने रविवारी उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये महापंचायतीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील, असा विश्‍वास भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केलाय. शेतकर्‍यांना महापंचायतीपर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कोणीही जर आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना फोडून काढू आणि महापंचायतीत पोहोचू, असे राकेश टिकैत यांनी म्हटलंय.

पंजाबमधून सुमारे दोन हजार शेतकरी मुझफ्फरनगरला पोहोचण्याची शक्यता आहे. ते अमृतसरहून पहाटे 4 वाजता, जालंधरमधून सकाळी 5 वाजता आणि लुधियानाहून सकाळी 6 वाजता एक्स्प्रेस ट्रेन पकडतील. दिल्ली सीमेवरील आंदोलनस्थळावरून 400 ते 500 शेतकरी महापंचायतीकडे रवाना होतील. टिकरी आणि गाजीपूर सीमेवरून शेतकरी बसने मुझफ्फरपूरसाठी निघत आहेत. शुक्रवारी रात्री दोन बस मुझफ्फरनगरसाठी रवाना झाल्या, शनिवारी सकाळी आणखी दोन बस गेल्या असून इतर बस रात्री शेतकर्‍यांना घेऊन निघतील. महापंचायतीसाठी गावांमधून मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत, असंही राकेश टिकैत यांनी सांगितलं. तसेच हरियाणा, महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांतील शेतकरीही महापंचायतील मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची शक्यता टिकैत यांनी वर्तवली.शेतकर्‍यांना मुजफ्फरनगरला नेण्यासाठी 500 बसेस भाड्याने घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Exit mobile version