।माथेरान । प्रतिनिधी ।
सन 1919 मध्ये स्व. रतनबाई पेस्तनजी यांच्या स्मरणार्थ उभारलेले कापडिया मार्केट त्याकाळी त्यांच्या नातेवाईकांनी स्वखर्चाने बांधून नगरपरिषदेकडे लोकार्पण केले होते. या मार्केट मध्ये स्थानिकांना रोजगाराच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या सेवाभावी विचाराने याठिकाणी अनेक गाळे व्यवसायासाठी बांधण्यात आले होते त्यातील कित्येक गाळे आजही बंद अवस्थेत आहेत. नुकताच या भव्य मार्केटच्या सुशिभिकरणासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून जवळपास पाऊण कोटी रुपये खर्च करून त्याचे नूतनीकरण करण्यासाठी संबंधीत ठेकेदारांमार्फत कामे सुरू झाली होती परंतु तीन वर्षांपासून या मार्केटची कामे आजही अपूर्णावस्थेत आहेत.
माथेरानमधील एक ब्रिटीश कालीन सुंदर ठेवा असणार्या मुख्य बाजारपेठेतील कापडिया मार्केट या हेरिटेज वास्तूला एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात येत आह. परंतु तेथील बंद गाळ्यांना एकप्रकारे भंगाराचे गोडाऊन बनवले जात आहे. हे आतातरी नगरपरिषदेच्या अधिकार्यांनी थांबवावे आणि जे खरोखरच गरजवंत, सुशिक्षित बेरोजगार आहेत, अशांना ह्या गाळ्यांचा उपयोग स्वयंरोजगार करीता देण्यात यावा अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते निखिल शिंदे यांनी केली आहे.
माथेरानच्या मध्यवर्ती भागात हे आकर्षक हेरिटेज मार्केट लोकांना रोजगार निर्मिती होण्यासाठी त्याकाळी स्व. रतनबाई पेस्तनजी यांच्या स्मरणार्थ बांधून दिले होते. दानशूर व्यक्तीनी ही अमूल्य भेट मोफत दिलेली असताना त्या वास्तूची सुयोग्य प्रकारे निगराणी आणि स्वच्छता राखणे हे या मार्केट मधील गाळ्यांचा उपभोग घेणार्या व्यावसायिकांचे सुद्धा कर्तव्य आणि जबाबदारी आहे. परंतु अनेकदा येथील काही ठिकाणी तर दुर्गंधीयुक्त कचर्याचे साम्राज्य नेहमीच पर्यटकांच्या निदर्शनास येते त्यामुळे सहसा या हेरीटेज वास्तूला पाहण्याची इच्छा असताना देखील पर्यटकांना या ठिकाणी जाऊन या सुंदर वास्तूचा अभ्यास,निरीक्षण करता येत नाही.
लाखो रुपये खर्च करून कपाडिया मार्केट मधील गाळे शेवटची कात टाकत आहेत.
कपाडिया मार्केटचे गाळे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले असून मार्केटला जे काही भंगाराच्या गोदामाचे स्वरूप प्राप्त होत चालले आहे याला सर्वस्वी जबाबदार कोण ? तत्कालीन लोकप्रतिनिधी की नगरपरिषदेचे अधिकारी वर्ग आहेत. अजूनही या ठिकाणी कामे अपूर्णावस्थेत आहेत संबंधित ठेकेदाराने ही कामे का अपूर्ण ठेवली आहेत त्यामुळे या सुंदर वास्तूला एकप्रकारे बकालपणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी लवकरात लवकर येथील गाळ्यांची गोडाऊन होण्यापूर्वी नगरपरिषदेच्या अधिकार्यांनी ताबडतोब कार्यवाही करावी असेही निखिल शिंदेंनी सांगितले आहे.
कापडिया मार्केट या हेरीटेज वास्तूच्या नूतनिकरणासाठी 75 लक्ष रुपये खर्चाची निविदा काढली होती. सब ठेकेदारांनी जी कामे निविदेत नमुद नाहीत ती करण्यावरच अधिक भर दिला होता. ठेकेदाराने अतिशय निकृष्ठ आणि नियोजन शून्य कामे केलेली आहेत. सदर निकृष्ठ दर्जाच्या कामाबद्दल नगरपरिषदेच्या कार्यालयात लेखी पत्रव्यवहार केलेला आहे.
-शिवाजी शिंदे






