। अलिबाग । प्रतिनिधी ।
मुलगा आईच्या म्हातारपणाचा आधार तर पत्नी सातजन्माची साथ म्हणून ओळखले जाते. परंतू तोच मुलगा, तोच नवरा पत्नी व आईच्या जीवावर उठल्यावर काय स्थिती होते, हे मानकर कुटूंबियातील त्या पत्नीला व आईला पाहून समजेल. किरकोळ कारणावरुन मुलगा, पत्नीसह जन्मदात्या त्या वयोवृद्ध आईचीही तमा न बाळगणार्या, त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा आज मोकाट फिरत आहे. त्यामुळे सर्वत्र संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर कृषीवलच्या टीमने जखमी आई व पत्नीची भेट घेतली असता असला मुलगा, नवरा नको! अशी संतापजनक प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.
चंद्रकांत मानकर असे या मारेकर्याचे नाव आहे. वयोवृध्द लक्ष्मी मानकर यांचा मुलगा व चेतना मानकर यांचा पती आहे. गेल्या 26 वर्षापूर्वी चेतना यांचे चंद्रकांत यांच्यासोबत लग्न झाले. परंतु दारुच्या आहारी गेलेल्या चंद्रकांत मानकर यांनी कुटुंबाची जबाबदारी झटकली. सतत दारु पिणे आणि कुटुंंबातील मंडळींसोबत भांडण करणे. त्यांना मारहाण करणे हे नित्याचेच होते. त्याच्या जाचाला कंटाळून घरातील सर्व मंडळी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. गेल्या सहा महिन्यापूर्वी किरकोळ कारणावरून या नराधमाने वीस वर्षीय भाचीचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी घरातील मंडळींनी त्याच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र राजकिय वरदहस्तामुळे त्याच्याविरोधात कठोर कारवाई होत नसल्याने त्याचे चांगलेच फावले होते. त्यामुळे कुटुंबातील आई, पत्नी व मुलगा यांचा त्याने कायमच छळ सुरु ठेवला. चार दिवसापूर्वी चंद्रकांत मानकर याने दारुच्या नशेत पत्नी, मुलगा व आईला बेदम मारहाण केली. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तपास अधिकार्यांकडून न्यायाची अपेक्षा
बोरपाडा येथील मारहाण प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार सुनील सोनकर यांच्याकडे तपास देण्यात आला आहे. चंद्रकांत मानकर याला अटक करून पुढील तपासाची सूत्रे पोलिसांनी हलविली आहेत. बोरपाडा येथे जाऊन हल्ला केलेल्या हत्याराचा शोध घेतला. तपासिक अधिकार्यांकडून अन्यायग्रस्त आई, पत्नी व मुलाला न्यायाची प्रतिक्षा लागून राहिली असून सोनक या गुन्ह्याचा तपास योग्य करून या जखमींना न्याय देतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
पुत्र नव्हे कलंक! जन्मदात्या माऊलीने दिली प्रतिक्रिया
पोलीसी खाक्यांनाही न घाबरणारा, कायद्याचे उल्लंघन करणार्या चंद्रकांत मानकर यांनी त्यानंतर थेट रुग्णालयात गाठत जखमींना शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. चंद्रकांत मानकर हा इसम अशा प्रकारच्या धमक्या, शिविगाळ व ठार मारण्याचा प्रयत्न करीत असल्याने कुटूंबात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, या महिलांना घरात राहणे आता कठीण होऊन बसले आहे. याबाबत लक्ष्मी मानकर यांना विचारणा केली असता पुत्र नव्हे कलंक, असा मुलगा कोणालाही न मिळो अशी संतापजनक प्रतिक्रिया दिली.