कर्जतकरांचे ग्राम दैवत श्री धापया महाराजांचा दर्शनाला सकाळ पासून गर्दी
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराज यांचा उत्सव आज अक्षय तृतियेपासून सुरू झाला. श्री धापया महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली होती. सायंकाळी धापया महाराजांची पालखी मिरवणूक शहरातून काढण्यात आली. उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून शंभर वर्षांहून अधिक परंपरा असलेला कुस्ती आखाडा रंगणार आहे.
पहाटे सनई वादनाने प्रसन्न वातावरण निर्माण झाले. त्यानंतर श्रींची पूजा करण्यात आली. दिलीप ठाकरे आणि वैभव डागा यांच्या हस्ते लघुरुद्र करण्यात आला. त्यानंतर नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली. सायंकाळी अध्यक्ष गणेश शिंदे, महेंद्र चंदन, मनोज वरसोलीकर, आदींच्या मार्गदर्शनाखाली श्री धापया महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. कर्जत शहरातील घराघरातील सुहासिनींनी धापया महाराजांची आरती केली. सायंकाळी स्थानिक भजनी बुवांच्या चक्री भजनाचे आयोजन करण्यात आले होते. चाकरमान्यांनी रात्री दर्शनासाठी गर्दी केली होती.
उद्या सकाळ पासून कुस्त्यांना सुरुवात होणार असून लहान पहेलवानांच्या कुस्त्या सकाळी रंगतात तर दुपार नंतर मोठ्या पहेलवानांच्या कुस्त्यांची सुरुवात होते. या कुस्ती आखाड्यात अनेक नामवंत कुस्तीगिर उपस्थिती दर्शवितात. मुंबई, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर आदी भागातील पहेलवान येथे येतात. या कुस्ती आखाड्याला शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा आहे.