महानगरच्या गॅस पाईप प्रकल्पाचे खोदकाम
| नवीन पनवेल | वार्ताहर |
नवीन पनवेल डीएव्ही शाळेच्या समोरील रस्त्यावर सेक्टर 9 सिध्द विनायक सोसायटी परिसरात महानगर गस पाईपच्या प्रकल्पाचे खोदकाम सुरू असताना या यंत्राचा धक्का लागून रस्त्यावरील सिडकोची जलवाहिनी फुटली आहे. या घटनेला दोन दिवस उलटून गेले असून, त्यातून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. यामुळे या वाहिनीवरून होणार्या परिसरांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.
नवीन पनवेल सेक्टर 7,8,9 परिसरात महानगर गस कामाच्या पाईप टाकण्याची कामे सुरू आहेत. या खोदकामे करताना पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्यांकडे कंत्राटदाराकडून दुर्लक्ष होत.
असल्यामुळे या परिसरात रस्त्याखालून जाणार्या जलवाहिन्या फुटून लाखो लिटर पाणी वाया जाण्याच्या घटना या परिसरात घडत असतात. नविन पनवेल येथिल डीएव्ही शाळेसमोरच्या रस्त्यावर सिध्द विनायक सोसायटीसमोर रस्त्याचे खोदकाम करताना गुरुवारी सायंकाळी पासून सिडकोची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
एप्रिल-मे महिन्यात नविन पनवेलमध्ये बर्याच भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागते. दुसरीकडे सिडको प्रशासनाच्या हलगर्जीमुळे पाइपलाइन फुटून लाखो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यातच अधिकार्यांना कळवूनही अधिकारी वेळेवर फिरकले नसल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच फुटलेल्या पाईपलाईनमधून माती युक्त पाणी परिसरातील सोसायटीच्या टाकीत गेल्याने सोसायटीतील पिण्याचे पाणीसुद्धा दूषित झाले. यामुळे सोसायट्यांना टाक्या साफ करून परत खासगी टँकरने पाणी आणावे लागले. यामुळे या परिसरातील सोसायटींना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.