चोळेटेप टेकडीवर पाण्याची टाकी नको

ग्रामस्थांची जि.प. सीईओंकडे तक्रार; पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी.

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

ग्रामपंचायत शिहू हद्दीत चोळेटेप येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची योजना मंजूर झाली आहे. परंतु, चोळेटेप येथे पाणी साठवण जागा योग्य नसल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भातील लेखी निवेदन रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.

येथील ग्रामस्थ दीपक पाटील, पुंडलिक म्हात्रे, नितीन पाटील, मोतीराम म्हात्रे, प्रमोद म्हात्रे, मनोहर कुथे, प्रशांत म्हात्रे, निवृत्ती म्हात्रे, हरिश्‍चंद्र म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, मधुसूदन पाटील आदींच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत. सदर तक्रारी निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की, चोळे टेप येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी बांधण्यासाठी निश्‍चित केलेली जागा योग्य नसून, त्या जागेच्या आजूबाजूला टेकडीवर लोकवस्ती असून, तिथे पाणी टाकी बांधल्यास आमच्या घराला, लोकवस्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजूलाच खालील बाजूस प्राथमिक शाळा चोळे गांधे आहे. टेकडीवरील जागा सतत ढासळत आहे. आम्ही ग्रामस्थांनी सतत टेकडी ढासळत असल्याने श्रमदान व अनुदानातून टेकडी ढासळत असल्याने संरक्षण कठडा बांधला आहे. टेकडीवर पाण्याची टाकी बांधल्यास येथील घरे, शाळा व मंदिराला धोका पोहोचणार आहे.

चोळे टेप येथे सुरळीत पाणीपुरवठा आहे, तरी त्या पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी नळ योजना राबविण्यात यावी. अन्यथा साठवण टाकी बांधण्यासाठी पर्यायी जागा निवडून अथवा उपलब्धतेनुसार योग्य जागा निवडावी. अन्यथा लहान मुलांच्या भवितव्यासाठी घरे, मंदिर व शाळेच्या बचावासाठी सर्व ग्रामस्थ जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसतील, असा इशारा चोळे टेप ग्रामस्थांनी दिला आहे.

Exit mobile version