मतदारांची होणार घरोघरी पडताळणी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एक जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदारयादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत 21 जुलै ते 21 ऑगस्ट या कालावधीत मतदाराची घरोघरी पडताळणी होणार आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत ही प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करण्यात येणार आहे. 2024 मध्ये विधानसभा, लोकसभा निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर होण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरु झाल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम सुुरू केला जाणार आहे. नवीन मतदार नोंदणी करणे, मतदार यादीतील नाव, वय, पत्ता दुरुस्ती करणे, मयत स्थलांतरित मतदारांचे नाव वगळणी करणे, मतदारयादीतील वय वर्षे 80 वरील मतदारांची पडताळणी करणे, मतदारयादीतील अस्पष्ट फोटोबाबत कार्यवाही करणे, युवा मतदारांची विशेषत: 1 ऑक्टोबर, 2023 व 1 जानेवारी 2024 या महिन्याच्या 1 तारखेला अथवा त्याआधी 18 वर्ष पूर्ण होणार्‍या मतदारांची नोंदणी केली जाणार आहे.

वोटर हेल्पलाईन अ‍ॅप, वोटर सर्व्हिस पोर्टल या वेबसाईट वरुन मतदार नाव नोंदणी दुरुस्तीसाठी अर्ज करता येणार आहे. 1 जानेवारी 2024 या दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत पुनरिक्षण-पूर्व उपक्रम राबविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी योगेश म्हसे यांनी केले आहे.

जिल्ह्यात विशेष शिबीरांचे आयोजन
महिला, अपंग, तृतीयपंथी यांच्या मतदार नोंदणीमध्ये वाढ होण्यासाठीकरिता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी करण्यासाठी अधिकाधिक जनजागृती देखील करण्यात येणार आहे. तसेच दर शनिवार रविवारी मतदान केंद्रामध्ये शिबीर घेऊन 80 पेक्षा अधिक वयोगट असलेले मतदार, मतदान कार्डमध्ये ठळक न दिसणारे छायाचित्र, युवा तरुणांची नोंदणी केली जाणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारयादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार, जिल्ह्यात प्रभावीपणे राबविला जाणार आहेत. जिल्ह्यात दोन हजार 733 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत घरोघरी पडताळणी केली जाणार आहे.

स्नेहा उबाळे – उपजिल्हा निवडणूक अधिकारी
Exit mobile version