रुग्णालयांना मनपाकडून नियमांचा डोस

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल परिसरातील रुग्णालयांना अग्निसुरक्षा नियमावली नुसार संरचनात्मक बदल केल्यास परवाने नूतनीकरण केले जाणार नाही अशा प्रकारचे धोरण पनवेल मनपाने अवलंबून रुग्णालय चालकांना नियमावर बोट ठेवून एक प्रकारे डोस दिला आहे. मात्र यात बदल करणे अवघड असल्याने रुग्णालय व्यवस्थापनाची डोकेदुखी एक प्रकारे वाढली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालय आहेत. पनवेल शहरासह नवीन पनवेल खांदा वसाहत, खारघर, कळंबोली, कामोठे येथे रुग्णालयांची संख्या जास्त आहे. बहुतांशी रुग्णालय हे पनवेल मनपा स्थापन होण्याच्या अगोदर सुरू झालेले आहेत. विशेषतः पनवेल शहरातील हॉस्पिटल फार वर्षांचे आहेत. रुग्णालयाच्या इमारती सुद्धा जुन्या आहेत. त्यांना पूर्वी पनवेल नगर परिषदेकडून परवाना मिळत असे त्याचबरोबर त्याचे नूतनीकरण सुद्धा येथेच केले जात होते. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून संबंधित रुग्णालयांना आता मनपाचा परवाना गरजेचा आहे. मात्र त्यासाठी अग्निसुरक्षाचे सर्व नियम अटी आणि शर्तीचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे बहुतांशी रुग्णालयांना या नियमावलीनुसार संरचनात्मक बदल करणे भाग पडले आहे. त्यामुळे सहाजिकच खाजगी रुग्णालयांची डोकेदुखी एक प्रकारे वाढली आहे.

बदल केल्यास बांधकामाला धोका
पनवेल महानगरपालिकेने अग्नी सुरक्षा अंतर्गत संरक्षणात्मक बदल करण्याबाबतची नियमावली आणली आहे. वास्तविक पाहता बर्‍याच हॉस्पिटलचे संरचना ही महापालिका स्थापन होण्याच्या अगोदरची आहे. त्या काळात असलेल्या नियमानुसार तसे बांधकाम करण्यात आले होते. मात्र आता त्यामध्ये बदल करणे म्हणजेच इमारतींना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. संबंधित हॉस्पिटलांना संरचनात्मक बदल करणे अवघड आणि कठीण आहे.

Exit mobile version