किशोर/किशोरी गट कबड्डी स्पर्धा
। अलिबाग । हिरामण भोईर ।
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन तर्फे राजू समजीसकर मित्रमंडळ बांधण यांच्या आयोजनाखाली रायगड जिल्हा किशोर/किशोरी गट निवड चाचणी कबड्डी स्पर्धा बांधण येथे संपन्न झाली. या स्पर्धेत किशोर गटात 64, तर किशोरी गटात 16 संघांनी भाग घेतला होता. दोन्ही गटात अलिबाग तालुक्यातील ओंकार वेश्वी या संघांनी दुहेरी मुकुट मिळवून अजिंक्यपद पटकावले.
मुलांच्या पहिल्या उपांत्य फेरीत ओंकार वेश्वी संघाने मरीआई धेरंड संघाचा निसटता पराभव करुन अंतिम फेरीत खेळण्याचा मान मिळविला, तर दुसर्या उपांत्य फेरीत वेणगाव संघाने मळेघर संघाचा एकतर्फी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलींच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये बांधण संघाने दत्तात्रय स्पोर्टस् पनवेल संघाचा पराभव केला, तर दुसर्या सेमी फायनलमध्ये ओंकार वेश्वी संघाने किल्लेश्वर किहीम संघाचा पराभव करुन अंतिम फेरी गाठली.
मुलांचा अंतिम सामना
मुलांचा अंतिम सामना ओंकार वेश्वी आणि वेणगाव या दोन संघात झाला. हा सामना वेश्वी संघाने एकतर्फी झाला. वेश्वी संघाने या लढतीत वेणगाव संघाचे आव्हान 34-17 असा पराभव करीत अंतिम विजेतेपद पटकावले. या सामन्यात वेश्वीतर्फे प्रज्ज्वल नलावडे, वरुण पाटील, प्रेम कांबळी (कर्णधार) यांनी अष्टपैलू खेळ केला तर कौस्तुभ शेळके, निरज रहाळे, ओम शेळके, शुभम हराळे यांनी चांगली साथ दिली.
मुलींचा अंतिम सामना
मुलींचा अंतिम सामना ओंकार वेश्वी व प्रतिज्ञा बांधण या दोन संघात खूप रंगतदार झाला. दोन्ही संघांनी पकडी व चढायांचा बहारदार खेळ करुन गुणपत्रक हलता ठेवला होता. शेवटी हा सामना समान गुणांवर संपून पाच-पाच चढायांवर खेळविण्यात आला. शेवटच्या चढाईत कर्णधार वैष्णवी पाटीलने तीन खेळाडू बाद करुन 33-30 असा वेश्वी संघाने बांधण संघाचे आव्हान संपुष्टात आणून अजिंक्यपद पटकावले. वेश्वी संघाकडून वैष्णवी पाटील, अनया निर्मल, सानिका गोत यांनी सुरेख खेळ केला. तर सोनाली हार्ले, प्रचिती मुलुसकर, पायल धनगर, साभा खान यांनी चांगली साथ दिली, तर बांधण संघाकडून प्रिया गायकर, नेहाली पाटील छान खेळल्या.
मुलांचे पारितोषिक वितरण जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. तर मुलींचे पारितोषिक वितरण गोल्डन मॅन संदेश पवार, सचिन तावडे, राजू समजीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह जे.जे.पाटील ही उपस्थित होते.