सुशोभिकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
। आपटा । वार्ताहर ।
आपटा गावात असणार्या तळ्याची दुरवस्था झाली असून, ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तळ्याच्या सभोवती घाणीचे साम्राज्य पसरले असून, कचर्याचे ढीग तसेच विविध प्रकारच्या बाटल्यांचा खच पहावयास मिळत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आपटा गावात सरदार बिवलकर यांनी ग्रामस्थांसाठी स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा, यासाठी व्यवस्था केली होती. परंतु, आज याच तळ्याची अवस्था बिकट होऊन सभोवताली घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याकडे संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तळ्यावर जाण्यासाठी असलेल्या वाटादेखील वाढलेल्या गवताने झाकून गेल्या आहेत.
आपटा गावाचे सौंदर्य असलेल्या या भागाकडे देणे गरजेचे असून, किमान सर्व तळी व परिसरात साफसफाई केली पाहिजे. पूर्वी या तळ्याचे पाणी धुणेभांडी व गणपती विसर्जन करण्यासाठी केले जात होते, परंतु, आता हे शक्य नाही. अशा दुर्लक्षित तळ्यांकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थ व रसायनी पत्रकार संघाकडून करण्यात येत आहे.