महामेट्रोकडून महापालिकेस आराखडा सादर
। पुणे । प्रतिनिधी ।
महामेट्रोकडून वनाज ते चांदणी चौक या विस्तारीत मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. या मेट्रो मार्गासोबतच पौड रस्त्यावर कचरा डेपोपासून लोहिया आयटी पार्कपर्यंत दुमजली उड्डाणपूल उभारला जाणार आहे. याचा आराखडा महामेट्रोने महापालिकेस सादर केला आहे. पौंड रोडवर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूलाचे नियोन होते. त्यातच आता मेट्रोचेही विस्तारीकरण होणार असल्याने दुमजली उड्डाणपूलाची तयारी केली जात आहे.
शहराचे पश्चिम प्रवेशद्वार म्हणून पौड रस्ता ओळखला जातो. तसेच, पौड आणि पुणे-मुंबई महामार्गाकडे जाणारा हा शहरातील सर्वात जवळचा रस्ता आहे. परिणामी, या रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी मोठी गर्दी असते,लोहिया आयटी पार्क ते कचरा डेपोपर्यंत तीन सिग्नल असल्याने तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असल्याने सुमारे दिड कि.मी.च्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते.
पौंड रोडवर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेवून पालिकेकडून या रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन होते.आता महामेट्रोकडून वनाज ते चांदणी चौकापर्यंत मेट्रोचे विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यामुळे नळस्टॉप येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपूलाच्या धर्तीवर कोथरूड डेपोच्या समोरही उड्डाणपूल उभारला जाणार आहे. या पुलासाठी महामेट्रोकडून 85 कोटींचा खर्च अपेक्षीत धरण्यात आला आहे. त्यामुळे पौड रस्त्यावर कोथरूड डेपो परिसरात होणारी वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.