। अहमदनगर । प्रतिनिधी ।
दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना अहमदनगरच्या अकोले तालुक्यात घडली आहे. दिरानेच त्याच्या दोन भावजयींची कोयत्याने वार करुन हत्या केली. हत्येनंतर दीर घटनास्थळावरुन फरार झाला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ही घटना अकोले तालुक्यातील बेलापूर गावात सोमवारी (दि. 07) दुपारी घडली. जमिनीच्या आणि पैशाच्या किरकोळ वादातून दत्तात्रय प्रकाश फापाळे याने उज्वला अशोक फापाळे आणि वैशाली संदीप फापाळे या आपल्या दोन भावजयींची म्हणजेच वहिनींची धारदार कोयत्याने वार करून हत्या केली. हत्येनंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. तसेच, याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.