माहूरमध्ये दुहेरी हत्याकांड; दोन सख्ख्या जावांचा खून

। नांदेड । प्रतिनिधी ।

माहूर तालुक्यातील पाचोंदा शिवारात गुरुवारी (दि.20) घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्वतःच्या शेतात कापूस वेचणीचे काम करत असताना दोन सख्ख्या जावांचा अज्ञात संशयिताने गळा दाबून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांत अंतकलाबाई अशोक अडागळे (60) आणि अनुसयाबाई साहेबराव अडागळे (45) यांचा समावेश आहे. दोघीही सकाळी आप आपल्या शेतात कापूस वेचण्या करीता गेल्या होत्या.

सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान अडागळे शेतात गेले असता त्यांना दोघीही मृत अवस्थेत दिसल्या व दोघीच्याही अंगावरील सोन्याचे दांगीने लंपास केले होते. अज्ञात व्यक्तीने अचानक हल्ला करून दोघींच्या गळा दाबून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी माहूरचे पोलीस निरीक्षक साहेबराव चोपडे यांनी आपल्या कर्मचारीसह भेट देऊन पाहणी केली. सदर गुन्ह्यामुळे माहूर तालुका हादरला असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना लूटमारीशी संबंधित आहे की, कोणत्या वैयक्तिक वैमनस्यातून घडली? याप्रकरणी पुढील तपास माहूर पोलीस करत आहेत.

Exit mobile version