दुबार मतदार संशयास्पद

शेकापकडून नावे रद्द होण्यासाठी न्यायालयात धाव

। पनवेल । वार्ताहर ।

भारतीय शेतकरी कामगार पक्षाने पनवेल, उरणसह नवी मुंबईतील विविध विधानसभा मतदारसंघाच्या मतदारसंख्येत 85,129 मतदारांची दुबार नावे तातडीने रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शेकापचे माजी आ. बाळाराम पाटील यांनी याबाबत पहिल्यांदा पनवेलच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे मागणी केली. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती दिली आहे.

सर्वाधिक मतदार संख्या असलेल्या विधानसभा क्षेत्रात पनवेल विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. या मतदारसंघात 6 लाख 42 हजार 57 मतदार आहेत. विविध औद्योगिक वसाहतींसह माथाडी कामगार पनवेलमध्ये राहतात. सध्या पनवेलमधील दुबार नावे असलेल्या मतदारांची संख्या 25 हजार 772 एवढी असून पत्ते व दोषयुक्त असलेले 588 नावे आहेत, असे असल्याने माजी आ. पाटील यांनी संशय व्यक्त केला आहे. उरण विधानसभा मतदार संघात 27,275 मतदार तसेच बेलापूर विधानसभा मतदार संघात 15,398 मतदार आणि ऐरोली विधानसभा मतदार संघात 16 हजार 96 मतदारांची नोंद असल्याचे निदर्शनास आल्याने माजी आ. पाटील यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना निवेदनाद्वारे प्रत्यक्ष दुबार व दोषयुक्त मतदारांच्या नावांची यादीसह नावे कमी करण्यासाठी लेखी तक्रार दाखल केली. अधिकारी वर्गाकडून दिरंगाई होण्याची शक्यता असल्याने व मतदार संघात बोगस मतदान होऊ नये म्हणून न्याय मिळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे.

माजी आ. पाटील यांनी पनवेल विधानसभा मतदार संघात नोंद असलेले आणि आजुबाजुला हाकेच्या अंतरावर असलेल्या इतर उरण, नवी मुंबईतील विधानसभा मतदारसंघात ही नोंद असलेल्या मतदार तसेच संशयास्पद पत्ते नसलेले अणि पनवेल मतदारसंघातील मतदार यादीत दुबार नावे असलेली रद्द करावी अशी मागणी 10 सप्टेंबरला केली होती.
Exit mobile version