खोपोलीत दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा

जिल्ह्यातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

| खोपोली | प्रतिनिधी |

खोपोलीतील बॅडमिंटन खेळाडूंसाठी स्वतंत्र मैदान नसल्याने खेळाडू जागेच्या शोधात होते. खेळाडूंना सहकार्याची भूमिका दाखवत गेल्या वर्षी पोलीस ठाण्यातील बॅडमिंटन हॉल उपलब्ध करून दिला. अक्षय बॅडमिंटन अकॅडमी याठिकाणी एक वर्ष पूर्ण झाल्याने पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन पोलीस ठाण्यातील शहीद अशोक कामटे बॅडमिंटन हॉल येथे रविवार, दि. 24 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. सकाळी पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक शीतल राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश कळसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. पुरोगामी पत्रकार संघ (भारत) राजू भारंशे आणि बॅडमिंटन प्रेक्षक उपस्थित होते. पुरुष दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत खोपोली, अलिबाग, रोहा, रसायनी ठिकाणांहून 16 ग्रुपमधील 32 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत अक्षय बॅडमिंटन अकॅडमीचे प्रशिक्षक अक्षय भिंगारी (खोपोली) तसेच तुषार मुने (रसायनी) यांना रोख रक्कम 10 हजार व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक नितीन जैन आणि सुशांत पळसणकर (अलिबाग), तृतीय क्रमांक अफजल सैफी आणि सुधीर गायकवाड (खोपोली) यांना रोख रक्कम 5 हजार व आकर्षक चषक सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश कळसेकर यांच्या हस्ते देण्यात आले.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी क्रीडाप्रेमी विशेष सुरक्षा विभाग मुंबई अमोल वळसण यांचे सहकार्य लाभले. तर, खोपोलीतील इतर क्रीडाप्रेमी सुधीर गायकवाड, गणेश गडद, अफजल सैफी, शुभम पाटील, रफीक कर्जीकर यांनी ही सहकार्य केले.

शहीद अशोक कामटे बॅडमिंटन हॉल पोलिसांसाठी बांधण्यात आला आहे. परंतु, पोलीस बांधव कामात व्यस्त असल्याने खेळण्यासाठी वेळ मिळत नाही; परंतु अक्षय बॅडमिंटन अकॅडमीच्या माध्यमातून पोलिसांची मुलं आणि शहरातील खेळाडू याठिकाणी सराव करतात, याबबत मोठे समाधान वाटत आहे.

हरेश कळसेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, खोपोली पोलीस ठाणे

पोलीस ठाण्याच्या आवारात येताना भीती वाटत असते. मात्र, शहीद अशोक कामटे बॅडमिंटन हॉल खेळाडूसांठी उपलब्ध करून दिल्याबद्दल पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांचे आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे अभार.

शिल्पा मोदी, बॅडमिंटपटू
Exit mobile version