50 लाखांच्या खर्चाचा हिशोब द्यावा, ग्रामस्थांचा इशारा
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
तलाव सुशोभीकरणासाठी खर्च दाखवलेल्या सुमारे 50 लाख रुपयांवर बोर्लीपंचतनमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रत्यक्षात काम अपूर्ण असल्याने नागरिकांनी चौकशीची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील तलाव सुशोभीकरणाच्या कामावर गंभीर शंका उपस्थित होत आहेत. पहिल्या टप्प्यात तलावाच्या तीन बाजूंना भिंत आणि कठडा उभारण्यासाठी सुमारे 50 लाख रुपये खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत या भिंतींशिवाय इतर कोणतेही ठोस काम झाल्याचे दिसत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.
तलाव परिसरात वाढलेले गवत, अपूर्ण बांधकाम आणि दुर्लक्षित अवस्था स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे खर्चाच्या तुलनेत कामाची गुणवत्ता आणि प्रगती यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा मुद्दा यापूर्वी श्रीवर्धन येथे झालेल्या जनता दरबारातही उपस्थित करण्यात आला होता. संबंधित अधिकाऱ्यांना छायाचित्रांसह चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणताही ठोस अहवाल समोर आलेला नसल्याने संशय अधिकच वाढला आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे पारदर्शकतेची मागणी करत, “दाखवलेला निधी नेमका कुठे खर्च झाला, याचा स्पष्ट हिशोब द्यावा,” अशी भूमिका मांडली आहे. तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून काम मार्गी लावावे, असे आवाहन केले आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तलावाचे काम तातडीने पूर्ण व्हावे, अन्यथा अर्धवट अवस्थेची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. संबंधित विभागाने निधीचा वापर, कामाची सद्यःस्थिती आणि पुढील नियोजन याबाबत तातडीने स्पष्ट माहिती जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.







