खुशखबर! STRAVA हे अ‍ॅप डाऊनलोड करा अन् सायकल भ्रमंती करा


। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग सायकल क्लब रायगड जिल्ह्यातील सर्व सायकल प्रेमींना एकत्र आणण्यासाठी रायगड जोडो अभियान राबवित आहे. सायकल काळाची गरज आहे. आज इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत, वाहनापासून होणार्‍या प्रदूषणामुळे वातावरण दूषित होत आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःचे अनमोल शारीरिक स्वास्थ्य संभाळणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला कोरोनाने दाखवून दिले आहे.

वेगवेगळ्या गावात शहरात अनेकजण सायकलिंग करत असतात. या सर्वांना अलिबाग सायकल क्लब एकाच व्यासपीठावर आणू इच्छित आहे. त्यासाठी आपल्यात एक नाते निर्माण होणे गरजेचे आहे. आणि त्यासाठीच या रायगड जोडो सायकलिंग अभियानचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत अलिबाग सायकल क्लबचे सदस्य रापगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून सायकलवर भ्रमंती करणार आहेत. या सायकल प्रवासात ते स्थानिक सायकल ग्रुप, सायकलिस्ट यासोबत चर्चा करणार आहेत आणि त्यांना अलिबाग क्लब बरोबर जोडणार आहेत.

अलिबाग सायकल क्लबचे सदस्य अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर, माणगाव, रोहा, सुधागड, पाली, खालापूर, कर्जत, पनवेत, उरण, पेण व परत अलिबाग असा प्रवास करणार आहेत. हा प्रवास साधारणपणे चार ते पाच दिवसात पूर्ण होणार आहे. हे अभियान दिनांक 20 ते 24 दिनांक सप्टेंबर या कालावधीत होणार असून या अभियानामध्ये सहभागी होणार्‍या सर्वांनी गुगल फॉर्मवर माहिती भरून सबमिट करावयाची आहे. सक्रीय सहभाग घेणार्‍या सर्व सायकलिस्ट यांनी STRAVA हे अ‍ॅप डाउनलोड करून अलिबाग सायकल क्लबमध्ये सामील होता येणार आहे.

Exit mobile version