पत्रकार संघ पाठपुरावा करणार
| उरण | वार्ताहर |
उरणमध्ये वीज रोहित्र यंत्र चोरणारी रॅकेट कार्यरत आहे. आजपर्यंत अधिकारी वर्गाच्या माहितीनुसार 15 रोहित्र यंत्र चोरीला गेल्याचे सांगितले जात असले तरी याचे प्रमाण जास्त असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सदरचे प्रकरण हे सिडकोच्या माध्यमातून रस्त्यावर उभारण्यात आलेल्या विद्युत पोल बंद असल्याने ती त्वरित सुरू करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली असता संबंधित ठेकेदाराने ही धक्कादायक माहिती दिली. यामुळेच विद्युत पुरवठा बंद असल्याचे अधिकारी वर्गाने पत्रकार संघाला सांगितले. त्यामधील एक वीज रोहित्र हे नवीन बसविल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी चोरटे पळविण्यात यशस्वी झाल्याचे सांगितले.
सिडकोच्या माध्यमातून उरणचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामध्ये रस्त्यांचे रुंदीकरण व रस्त्यावर वीज रोषणाई व इतर सोयीसुविधा सुरू आहेत. त्यामध्ये रस्त्यावर वीज पुरवठा सुरू करून तो काही दिवसांतच बंद पडला आहे. यामुळे रात्रीच्यावेळी अपघात घडण्याची शक्यता वाहन चालक व्यक्त करीत आहेत.