कमिशनर बी सुमिदा देवी यांनी केली नोटीस प्रसिद्ध
| उरण | प्रतिनिधी |
उरणमध्ये मोठया प्रमाणात गोदामे, विविध प्रकल्प कार्यरत आहेत. मात्र अनेक प्रकल्प, कंपनीमधून विविध अटी-शर्तीचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. उरणच्या खोपटे गावातील मेसर्स कॉन्टिनेंटल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन (न्हावा- शेवा) प्रायव्हेट लिमिटेड जी सध्या मेसर्स डीपी वर्ल्ड मल्टीमॉडल लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाते, या गोदाम कंपनीचा कस्टम परवाना रद्द झाला आहे. कस्टमने घातलेल्या अनेक अटी व शर्तीचा भंग केला जात असल्याची शिक्षा म्हणून या कंपनीचा कस्टम परवानाच निलंबित करण्यात आला आहे. कस्टमने घेतलेल्या या कठोर भुमिकेचे परिसरात स्वागत केले जात असून, अजूनही काही कंपन्या कस्टमच्या रडारवर असल्याची माहीती हाती आली आहे.
डीपी वर्ल्डचा कस्टम परवाना निलंबित करताना कस्टमने 2009 च्या नियम 11 (2) च्या तरतुदींनुसार ही कारवाई केली असल्याची बाब जाहीर सूचनेमध्ये अधोरेखित करण्यात आली आहे. त्यामुळे कस्टमने काढलेल्या या नोटीशीच्या अनुशंगाने जोपर्यंत कस्टमचे पुढील आदेश येत नाहीत, तोपर्यंत डीपी वर्ल्डचे काँटिनेंटल गोदामातून पुढच्या काळात आयात-निर्यातीचे कोणतेही व्यवहार करू शकत नाही. तसे केल्यास ते कस्टमच्या कायद्याचा उल्लंघन या सदरात मोडण्याची शक्यता आहे. न्हावा-शेवा म्हणजेच जेएनपी कस्टम हाऊसच्या कमिशनर बी सुमिदा देवी यांच्या सहीने निर्गमित केलेल्या या नोटीसीद्वारे काँटीनेंटल उर्फ डीपी वर्ल्ड गोदामाचा कस्टम परवाना निलंबित करण्यात आला आहे. या नोटीसीचे उल्लंघन केल्यास त्यातून थेट मालकांवर देखील कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता काँटीनेंटल उर्फ डीपी वर्ल्डचे व्यवस्थापन नेमकी कोणती भुमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या सर्व प्रकाराबाबत काँटीनेंटलचे जावेद यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोन उचलले नाहीत.
उरण तालुक्यातील अनेक कंटेनर गोदामांकडून कस्टमच्या आणि महसुल खात्याच्या नियमांना हरताळ फासून या भागात कंटेनर गोदामांचा व्यवसाय केला जात आहे. तेरी भी चुप मेरी भी चूप अशा पद्धतीने चालणाऱ्या अशा गोदामांतील अनियमिततेचा फटका देखील अनेकांना बसत आहे. या कारवाईमुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात असून, या प्रकल्पाचे नेमके काय होणार याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा केल्या जात आहेत. या सर्व प्रकाराबाबत कंपनीची बाजू समजून घेण्यासाठी काँटीनेंटलच्या जावेद यांच्याशी त्याचबरोबर रेड्डी यांच्याशी सातत्याने संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी एकाही फोनला प्रतिसाद दिला नाही. तर कॉन्टीनेंटलचे एचआर मॅनेजर अविनाश लोंढे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकाराबाबत आपल्याला काहीही माहीती नसल्याची माहीती दिली. त्यामुळे कॉन्टीनेंटल उर्फ डीपी वर्ल्ड गोदाम प्रकल्पाची नेमकी बाजू समजू शकलेली नाही.






