डॉ. बी. एन. बास्टेवाड यांनी स्वीकारला पदभार

| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार डॉ. बी. एन. बास्टेवाड यांनी डॉ. किरण पाटील यांच्याकडून सोमवारी (दि.24) रोजी स्वीकारला. डॉ. किरण पाटील यांनी पुष्पगुच्छ व शुभेच्छा देऊन बास्टेवाड यांच्याकडे पदभार सोपवला.

डॉ. बी. एन. बास्टेवाड हे 1995 पासून प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांना अमरावती, यवतमाळ, नांदेड, मुंबई, ठाणे या ठिकाणी विविध पदांवर कामाचा अनुभव आहे. यासह तत्कालीन महिला व बाल विकास मंत्री विद्या ठाकूर यांचे सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. मागील चार वर्षांपासून ते महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई, येथे मुख्य महाव्यवस्थापक (एल. अँड एस.) पदावर कार्यरत होते. या कार्यकाळात त्यांनी 14 प्रकल्पांसाठी यशस्वीरित्या भूसंपादन प्रक्रिया राबविली आहे. त्यांच्या कार्यकाळात नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग या 700 कि.मी.च्या मार्गासाठी नऊ महिन्यात भूसंपादन प्रक्रिया राबवली होती. 2021-22 मध्ये डॉ. बास्टेवाड हे रायगड जातपडताळणी समितीचे अध्यक्ष होते.

डॉ. बी. एन. बास्टेवाड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी अभिनंदन केले. पदभार स्वीकारल्यानंतर शासनाच्या प्रत्येक योजना नागरिकांपर्यंत पोहोचवून, जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे डॉ. बी. एन. बास्टेवाड यांनी दिली.

Exit mobile version