| अलिबाग | प्रतिनिधी|
खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी या दरडग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आलेल्या निवारा केंद्राला रायगड जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन.बास्टेवाड यांनी सोमवारी (24 जुलै ) भेट देत पाहणी केली. यावेळी दुर्घटनाग्रस्त नागरिकांसोबत संवाद साधत त्यांना धीर दिला. त्यानंतर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कामांची पाहणी करीत संबंधितांना आवश्यक त्या सुचना केल्या.
दरडग्रस्त इरसालवाडी ग्रामस्थांचे जुन्या मुंबई-पुणे महामार्गाजवळ चौक परिसरात कंटेनर वसाहतीत पूनर्वसन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेमार्फत याठिकाणी 14 पथदिवे, नळ कनेक्शन, गटार व्यवस्था, बाथरूम, अंतर्गत रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. या कामांची पाहणी डॉ.बी. एन. बास्टेवाड यांनी सोमवारी भेट देत केली. लहान बालके, विद्यार्थी, अनाथ झालेली बालके यांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना यावेळी बास्टेवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दुर्घटनाग्रस्त बालके शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच यानंतर दरडग्रस्त इरसालवाडी ग्रामस्थांचे ज्या ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार आहे, त्या जागेची पाहणी केली. यावेळी खालापूर पंचायत समिती प्रभारी गटविकास अधिकारी सी. एस. राजपूत, विस्तार अधिकारी एम. डी. शिंदे, शैलेश तांडेल यांच्यासह पंचायत समिती स्थरावरील पाणी पुरवठा, आरोग्य, बांधकाम विभागासह इतर विभागातील अधिकारी उपस्थित होते.