डॉ. गणेश ठाकूर यांचा कुलाबा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालायचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉ. गणेश ठाकूर यांना शैक्षणिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी यावर्षीच्या राज्यस्तरीय कुलाबा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकतेच अलिबाग येथे संपन्न झालेल्या भव्यदिव्य समारंभात त्यांना आमदार जयंत पाटील व आमदार भाई जगताप यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांचा आधीही अनेक सन्मानाच्या पुरस्कारांनी गौरव झालेला आहे. रयत शिक्षण संस्थेने प्रबोधनकार ठाकरे उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार देऊन त्यांच्या शैक्षणिक व प्रशासकीय कार्याचा गौरव केला आहे. देशातील सर्वात जुने व जागतिक कीर्तीच्या मुंबई विद्यापीठानेही आपल्या 165 वर्षांच्या कारकिर्दीत सर्वप्रथम सुरु केलेल्या उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराचेही ते पहिले मानकरी ठरले आहेत. याशिवाय रायगडभूषण व कोकणरत्न यांसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनीही ते सन्मानित झाले आहेत. या पुरस्काराचा स्वीकार केल्यानंतर आपल्यावर होणाऱ्या कौतुकाच्या वर्षावाला प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, मला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे माझ्या महाविद्यालयातील सर्व घटकांना मिळालेला सन्मान आहे. हे माझे एकट्याचे यश नसून माझ्या महाविद्यालातील सर्वांचे आहे.

Exit mobile version