डॉ. चांदोरकरांचे नवीन गाणे व शॉर्ट फिल्मचे चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते प्रीमिअर रिलीज

। अलिबाग । वार्ताहर ।
डॉ राजेंद्र चांदोरकर यांच्या डॉ. राज प्रॉडक्शन्स तर्फे इवलीशी ईच्छा या शॉर्ट फिल्मचे तसेच बाबाची सोनपरी या व्हिडीओ गाण्याचे पी. एन. पी नाट्यगृह अलिबाग येथे रविवार दि. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी प्रीमिअर करण्यात आले. या कार्यक्रमास पीएनपी नाट्यगृहाच्या अध्यक्षा तसेच पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणुन उपस्थित होत्या. इवलीशी इच्छा हा लघुपट डुशीन/बेकर मस्क्युलर डिस्ट्रॉफी या अनुवांशिक आजाराने ग्रासलेल्या एका रुग्णाच्या व त्याच्या कुटुंबियांच्या खर्‍या व्यथांवर आधारित आहे. एखाद्या कुटुंबातील लहान बाळ जेव्हा दुर्धर आजाराने पीडित होतेे तेव्हा त्या कुटुंबाची होणारी परवड दाखवणारा हा लघुपट मनाला खुप भावतो. लघुपटातून जेनेटिक सल्ला, आजाराचे निदान, पुढील अपत्याविषयी घ्यावयाची काळजी तसेच आजार व उपचारांसंदर्भात गुगल सर्चचे तोटे याविषयी अनेक सामाजिक विषयांवर प्रबोधनपर माहिती देण्यात आली आहे. सचिन कांबळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या शॉर्ट फिल्मचे संगीत विक्रांत वार्डे, गीत मनिष अनसूरकर तसेच संकलन विशाल गायकवाड यांनी केले आहे.

अलिबागमधील सुप्रसिद्ध डॉ. चंद्रकांत वाजे, डॉ. सतीश विश्‍वेकर, डॉ. यतिश दोशी, डॉ. स्वाती रानवडे, डॉ. पुनम नाईक, डॉ. जुईली टेमकर तसेच डॉ. राजेंद्र चांदोरकर, डॉ. राजश्री चांदोरकर यांच्या यात भूमिका आहेत. ऍरीन कांबळे याने खर्‍या आयुष्यात या आजाराशी झुंज देणार्‍या बालकलाकाराची भूमिका पार पाडली आहे. विविध फिल्म फेस्टिवल्समध्ये या शॉर्ट फिल्मला पाठवण्याचा मानस यावेळी निर्माते डॉ. राजेंद्र चांदोरकर यांनी व्यक्त केला. बाबाची सोनपरी या व्हिडीओ गाण्याचे रिलीजसुद्धा याच कार्यक्रमात करण्यात आले. डॉ. राजेंद्र चांदोरकर यांनी गायलेले हे सुमधुर गीत मनिष अनसूरकर यांनी लिहीले असून त्यांनीच ते स्वरबद्ध केले आहे. सचिन कांबळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या गीताचे संकलन विशाल गायकवाड यांनी केले आहे. डॉ. राजेंद्र चांदोरकर, संवेदना चांदोरकर व डॉ. पुनम नाईक यांच्या प्रमुख भूमिका असलेले हे गीत एक सर्वसामान्य पिता व त्याच्या मुलीमधील संवेदनशील नातं प्रेक्षकांसमोर सादर करते. बाबाची सोनपरी या गाण्यामधून बाप आणि लेकीच्या अतूट अशा या नात्याला आणखी लाघवीपणाने आणि वेगळेपणाने मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

तसेच या दोन्ही कलाकृतींबद्दल बोलत असताना यामधील सर्वच कलाकारांचे काम आणि सर्वच गोष्टींची मांडणी अतिशय उल्लेखनीय आहे. गाण्यामधून दाखवलेले बाप-लेकीचे नात हे अगदीच काळजाला भिडणारे असून शॉर्ट फिल्ममध्ये दाखवलेली प्रत्येक गोष्ट ही अगदी सर्वसामान्य माणसाला वास्तवाशी ओळख पटवून देणारी आहे. असे वक्तव्य या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या शेकाप महिला आघाडी प्रमुख व नगरसेविका चित्रलेखा पाटील यांनी केले.

वरील दोन्ही प्रोजेक्ट्स dr rajendra chandorkar या युट्यूब चॅनलवर आपण पाहु शकता.

Exit mobile version