। नागोठणे । वार्ताहर ।
डॉ. रोहिदास शेळके यांनी शिहू येथील हायस्कूलचे चेअरमन म्हणून शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी बहुमोल कार्य केले आहे. आईवडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी विश्वस्त संस्था स्थापन करुन खेडोपाडी रुग्णांसाठी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून त्या संस्थेमार्फत आरोग्य सेवाही उपलब्ध करुन दिली. तसेच, नागोठणेतील विखुरलेल्या डॉक्टरांना एकत्रित आणून त्यांनी नागोठणे मेडिकल असोसिएशन निर्माण करुन रोहा तालुका व रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशनसाठी त्यांनी उल्लेखनीय व भरीव कार्य केल्याचे प्रतिपादन डॉ. राजेंद्र धात्रक यांनी केले.
नागोठण्यातील प्रथितयश डॉक्टर व रायगड भुषण पुरस्कारप्राप्त डॉ. रोहिदास शेळके यांच्या 63 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागोठण्यातील डॉ. नेल्सन मंडेला आश्रम शाळेतील विद्यार्थी व कर्मचारी वर्ग यांस फळे, केक व पेढे वाटून डॉ. शेळके यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. धात्रक बोलत होते.
यावेळी बापू रावकर, डॉ.जी.एस. कोकणे, डॉ. सुनील पाटील, डॉ. राजेंद्र धात्रक, डॉ. अनिल गिते, डॉ. नरेश सोष्टे, डॉ. अभिषेक शहासने, डॉ. प्रशांत भोईर, डॉ. निखिल गरूडे, कांचन रोहिदास शेळके, विजय पाटील, प्रदीप दळवी, प्रवीण जैन, नवनाथ डोंगरगावकर, इतर शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.