लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
| पेण | प्रतिनिधी |
पेण उपजिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय एकनाथ गवळी यांना भ्रष्टाचारप्रकरणी बुधवार, (दि.10) एप्रिल रोजी ताब्यात घेण्यात आले आहे. डॉ. विजय एकनाथ गवळी यांना 19 सप्टेंबर 2018 ला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विवेक जोशी आणि किरणकुमार बकाळे यांच्या पथकाने ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्यांच्या घराची झाडाझडती केली असता 23 लाख 96 हजारांची रोख रक्कम सापडली होती. या चौकशीअंती 1 कोटी 52 लाख 40 हजार 530 एवढी अपसंपदा संपादित केल्याचे आढळून आले असून, ही अपसंपदा त्यांच्या उत्पन्नापेक्षा 44.56 टक्के जास्त आहे.
दरम्यान, डॉ. गवळी यांच्या मालमत्तेचा शोध घेतल्यावर अनेक बाबी समोर आल्या. त्यामध्ये कोल्हापूर, पुणे, पनवेल, खारघर, पेण याठिकाणी सदनिका जमीन व गाळे असल्याचे उघडकीस आले होते. यामध्ये कोल्हापूरमध्ये दोन ठिकाणी जमीन व एक सदनिका, खारघरमध्ये एक सदनिका, पनवेलमध्ये एक सदनिका, पुण्यामध्ये एक सदनिका, तर पेणमध्ये दोन गाळे, दोन ठिकाणी जमीन अशा एकूण दहा ठिकाणी मालमत्तेची माहिती त्याठिकाणी उपलब्ध झाली. गेली सहा वर्षे डॉ. विजय गवळी व त्यांची पत्नी वर्षा गवळी यांच्या मालमत्तेची चौकशी सुरु होती. या चौकशीअंती 1 कोटी 52 लाख 40 हजार 530 एवढी अपसंपदा संपादित केल्याचे आढळून आले असून, ही अपसंपदा त्यांच्या उत्पन्नापेक्षा 44.56 टक्के जास्त आहे.
डॉ. विजय एकनाथ गवळी हे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय पेण येथे कार्यरत होते, तर व त्यांची पत्नी वर्षा विजय गवळी या अधिपरिचारिका उपजिल्हा रुग्णालय पेण येथे कार्यरत होत्या. यामध्ये डॉ. विजय एकनाथ गवळी यांच्याविरुद्ध दिनांक 19 सप्टेंबर 2018 रोजी पेण पोलीस ठाण्यात लाचेची रक्कम स्वीकारल्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर लोकसेवक डॉ. गवळी व कुटुंबिय यांनी संपादित केलेल्या मालमत्तेची उघड चौकशी करण्यात आली.
या चौकशीमध्ये आरोपी लोकसेवक डॉ. विजय गवळी यांचे व त्यांची पत्नी वर्षा गवळी यांची परीक्षण कालावधी दि. 01 जानेवारी 2008 ते दि. 19 जानेवारी 2018 पर्यंतचे एकूण उत्पन्न, खर्च व मालमत्ता यांची सविस्तर माहिती घेतली असता, त्यांनी परीक्षण कालावधी या शासकीय नोकरीचे कालावधीत आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करुन त्यांचे स्वतःचे व कुटुंबियांचे नावे 1,52,40,530/- रुपयांची अपसंपदा एकूण उत्पन्नाच्या 44.56 टक्के संपादित केली असल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरुन डॉ. विजय गवळी (57) व त्यांची पत्नी वर्षा गवळी (54) दोन्ही रा. वर्षा बंगला, शंकर नगर पेण, ता. पेण, जिल्हा रायगड यांच्याविरुद्ध फिर्यादी संतोष अरुण पाटील पोलीस निरीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो, नवी मुंबई यांनी गुन्हा दाखल करण्यात केला आहे. यातील आरोपी विजय गवळी यांना चौकशी कामी ताब्यात घेतले असून, त्यांच्या पत्नीलादेखील ताब्यात घेण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकरणाचा सखोल तपास सुनील लोखंडे पोलीस अधीक्षक व महेश तरडे अप्पर पोलीस अधीक्षक अॅन्टी करप्शन ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे हे करीत आहेत.