| अलिबाग | प्रतिनिधी |
पेझारी येथील ज्येष्ठ वैद्यकीय व्यक्तिमत्त्व डॉ. विष्णू वासुदेव पाटील (94) यांचे शनिवारी (दि. 29) पेझारी येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरातील एक अनुभवी, कर्तव्यनिष्ठ आणि सेवाभावी डॉक्टर गमावले असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
डॉ. पाटील यांचा जन्म 3 ऑगस्ट 1932 रोजी शहापूर ता. अलिबाग येथे झाला. लहानपणापासूनच वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची त्यांची जिद्द दृढ होती. त्यांनी मुंबईतील पोदार कॉलेजातून मेडिकल पदवी घेतली. त्याचबरोबर बीएससी व जीएफ.एमए हे शिक्षणही पूर्ण केले. आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात त्यांनी वरळी, मुंबई येथील लॅबर कॅम्पमध्ये डॉक्टर म्हणून केली. गरीब व श्रमिक वर्गाला स्वस्त आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे त्यांचे कार्य त्या काळात विशेष मानले जात होते.
मुंबईतील कामानंतर त्यांनी 1974 साली पोयनाड येथे स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केली. साधी, मैत्रीपूर्ण आणि रुग्णाला प्रथम मानणारी त्यांची उपचारपद्धती लोकांच्या मनात कायमची घर करून राहिली. 1968 ते 2019 या जवळपास 51 वर्षांच्या दीर्घ काळात त्यांनी हजारो रुग्णांची निःस्वार्थ सेवा केली. मुंबईत वास्तव्यास असताना समाजभान जपत त्यांनी ज्ञान प्रबोधिनी मंडळ स्थापन केले होते. या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग ओळखला जातो. आजही अनेक सभासद त्यांना आदराने आठवतात. डॉ. पाटील यांना मकरंद, अविनाश आणि सुषमा अशी तीन मुले असून, तिन्हीही मुले डॉक्टर आहेत. सर्व मुलांना पुढे स्वतःची मुले असून, पाटील कुटुंब वैद्यकीय क्षेत्रातच कार्यरत आहे. डॉ. विष्णू पाटील यांच्या जाण्याने पेझारी, पोयनाड व परिसरात शोककळा पसरली आहे. साधे, संयमी आणि सेवाभावी डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती. रुग्णांना त्यांनी नेहमीच मायेने आधार दिला, ही आठवण अनेकांच्या मनात कायम राहील. त्यांच्या निधनाने वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक दीर्घकाळ सेवाभावी युगाचा अंत झाला आहे.







