| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरातील नालेसफाई पाऊस लांबल्याने पूर्ण झाली आहे. गेल्या एक महिन्यात शहरातील 30 किलोमीटर लांबीचे नाले सफाई करण्यावर भर देण्यात आला होता. शहरात असलेल्या सर्व दहा प्रभागात नालेसफाई करण्याचा प्रयत्न पालिकेने केला असून, अनेक ठिकाणी स्थानिक नगरसेवक यांच्याकडून नालेसफाईची पाहणी केली जात आहे. कर्जत शहरात नाले पाण्याने तुंबल्याने कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी शहरातील सर्व नाल्यांची सफाई केली जात आहे. कर्जत नगरपरिषद हद्दीमध्ये उल्हास नदीचे क्षेत्र असून, उल्हासनदीला जोडणारे नाले आठ किलोमीटर लांबीचे आहेत. तर, अन्य पोट नाल्यांची लांबी 22 किलोमीटर असून, शहरात 30 किलोमीटर लांबीचे नाळे आहेत. नगरपरिषद क्षेत्रातील आलेले नाले आणि ओढे तसेच मोठी गटारे यांची साफसफाई पावसाळा पूर्व कामे म्हणुन करण्यात आली. गेल्या महिनाभर अत्यावश्यक बाब म्हणून नालेसफाईचे काम आरोग्य विभागाकडून सुरू आहे. त्यासाठी जेसीबी आणि प्रोक्लेम मशीन यांच्या सहाय्याने केली जात आहे.







