नाले गटारे तुंबली, जनतेसह भाविकही बेजार, दुर्गंधीचे साम्राज्य
पाली/बेणसे | वार्ताहर |
पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. अशा परिस्थितीत अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीमध्ये नालेसफाईला अजून सुरुवात झालेली नाही. परिणामी पावसाळ्यात नाले तुंबल्याने पुरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.
पाणी बॉटल, प्लॅस्टिकच्या पिशव्या, घरगुती कचरा व गाळ यामुळे ठिकठिकाणी नाले व गटारे तुंबले आहेत. या तूंबलेल्या गटारांमुळे सर्वत्र घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरते. या त्रासामुळे जनतेसह भाविकही बेजार झाले आहेत. येथील एसटी बस स्थानकासमोरील मोठा नाला, भोई आळी, आगर आळी, राम आळी, खडक आळी, कुंभार आळी, मधली आळी, सोनार आळी, कासार आळी, बल्लाळेश्वर नगर, कासार आळी व बल्लाळेश्वर मंदिराच्या भोवतालच्या परिसरातील नाले सफाईची कामे बाकी आहेत. साठलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात घाण व दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. नालेसफाई झाली नसल्यामुळे नागरीक संताप व्यक्त करत आहेत. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही या घाणीचा व दुर्गंधीचा त्रास होत आहे. पावसाळ्यात तर या तुंबलेल्या नाल्याचे व गटाराचे पाणी रस्त्यावर येवून पुर सदृश्य परिस्थिती निर्माण होते. तसेच रोगराईला आमंत्रण मिळते. त्यामुळे वेळीच नालेसफाई करण्याची मागणी पालीकर करत आहेत.
नाले-गटारांची दुरावस्था
अनेक नाले व गटारांची दुरुस्ती झालेली नाही. नाले व गटारे मोडकळीस आलेले आहेत. काही नाल्यांमध्ये तर झाडे आणि गवत उगवले आहे. तर काही नाले, गटारे गाळ व मातीने भरली आहेत.
पावसाळा तोंडावर आला आहे. नालेसफाई व औषध फवारणीची कामे वेळेत होणे आवश्यक आहे. अन्यथा नाले तुंबून पावसाळ्यात पुरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. नाले सफाई व स्वच्छतेच्या संदर्भात लवकर उपाययोजना करावी. नागरिकांनी प्लास्टिक बॉटल, पिशव्या व घरातील कचरा गटारे किंवा नाल्यात टाकू नये.
-अमित निंबाळकर,
माजी ग्रामपंचायत सदस्य, पाली
नालेसफाई संदर्भात गुरुवारी (ता.11) बैठक घेण्यात आली. पावसाळ्याआधी योग्यप्रकारे पूर्ण केली जाईल. यासाठी आवश्यक नियोजन, साधने व निधीची तरतूद करण्यात आली आहे.
-प्रणाली सूरज शेळके,
नगराध्यक्षा, पाली नगरपंचायत