पोलादपूर शहरातील नालेसफाईला गती

| पोलादपूर | वार्ताहर |

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या आदर्श आचारसंहितेच्या शिथिलीकरणाची वाट बघत न बसता पोलादपूर शहरातील नालेसफाई आणि गटार बांधकामांना गती देऊन नगरपंचायतीने पावसाळयापुर्वीच्या कामांबाबत सतर्कतेने सक्रीयता दर्शविण्यास सुरूवात केली आहे.

पोलादपूर शहरातील गाडीतळ, मटन-मच्छि मार्केट, शिवाजीनगर, मोहल्ला, सिध्देश्‍वरआळी, सिध्देश्‍वर शंकर मंदिर, मराठी प्राथमिक शाळा, श्रीदेवी गंगामाता मंदिर, पिंपळपार मारूती, गणेश मंदिरासमोरील घाट, जुना महाबळेश्‍वर रस्त्यावरील जुनी बाजारपेठ, स्मशानभूमी, प्रभात नगर पूर्वेकडील बाजू, आंबेडकर नगर, रोहिदास नगर, ग्रामीण रूग्णालयाची कर्मचारी वसाहत, हनुमान नगर तसेच, चरई पुलासमोरील रस्ता अशा ठिकाणी शहरातील सांडपाणी अतिवृष्टीदरम्यान निर्माण होणार्‍या पुरस्थितीमध्ये गटारांमध्ये येऊन सावित्री नदीपात्रामध्ये मिळत असते. मात्र, या गटारांमध्ये उतार नसल्यास शहरातील रस्त्यांवर सांडपाण्याची डबकी तयार होऊन निचरा होण्यास अडथळा निर्माण होत असल्याने पोलादपूर नगरपंचायतीने यंदा मे महिन्याअखेरिस या गटारांची तसेच, नालेसफाईची कामे हाती घेऊन दिलासा देण्याचा प्रयत्न चालविला आहे.

पोलादपूर शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि नवीन अपार्टमेंटसची वाढती संख्या लक्षात घेता पोलादपूर नगरपंचायतीकडून सुक्या आणि ओल्या कचर्‍याचे नियोजन करताना खासगी कंत्राटदारांकडून कचरा संकलन करण्यात येत असून खासगी कंत्राटदाराच्या तसेच, नगरपंचायतीच्या सफाई कामगारांकडून शहरातील स्वच्छतादेखील हाती घेण्यात आली आहे. पोलादपूर शहरातील शौचालयांच्या सांडपाण्याच्या टाक्यांचा उपसा करण्यासाठी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नसल्याने हे काम महाडमधील काही गाडयांकडून उपसा करून घेण्यापर्यंत मर्यादित आहे. गटारांलगतचे गवत व तण उपटण्यासाठीदेखील खासगी कंत्राटदाराचे कर्मचारी कार्यरत आहेत.

पोलादपूर शहरासाठी कचराप्रवण क्षेत्र म्हणजेच ‘डंम्पिंग ग्राऊंड’साठी भूसंपादन तसेच, जमिन खरेदी अथवा भाडेतत्वावर भूखंड ताब्यात घेण्याबाबत नगरपंचायतीमार्फत अनेक वेळा जाहिराती प्रसिध्द करूनही कोणत्याही प्रकारची अनुकूलता न मिळाल्याने शहरातील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी नदीची पूरस्थिती निर्माण झाल्यावर कचरा लोटणे हा एकमेव पर्याय नगरपंचायतीकडे आहे.

Exit mobile version