| जेएनपीटी | वार्ताहर |
उरण पंचायत समिती आणि उरण नगर पालिका यांच्या ढिसाळ कारभारामुळे चक्क गटारातील घाणीचे पाणी उरण पंचायत समितीच्या आवारात येत आहे. त्यामुळे जनतेच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी डंका वाजविणार्या शासकीय अधिकारांचे आरोग्यच धोक्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया कार्यालयात ये-जा करणारे नागरिक व्यक्त करीत आहेत.
उरण नगर पालिका व उरण पंचायत समितीच्या माध्यमातून शहरात, ग्रामीण भागातील गटारांची डागडुजी, साफसफाई करण्याची कामे लाखो रुपये खर्च करून पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आली. परंतु, जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने डंका वाजविणार्या उरण नगरपालिका व उरण पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील गटाराच्या कामाकडे लक्ष केंद्रित करण्यास मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी यांनाच वेळ मिळाला नाही. त्यामुळे आज पावसाळ्यातील गटारातील घाणीचे पाणी उरण पंचायत समितीच्या आवारात येऊ लागले आहे. अशा घाणीच्या पाण्यातून कार्यालयात कामानिमित्त ये-जा करणार्या नागरिकांना मार्गक्रमण करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळत आहे.