ड्रेस कोड नसल्यास मंदिरात प्रवेश नाही
| चौल | राकेश लोहार |
कार्ला गडावरील आई एकवीरा देवी ही आदिशक्ती असून, एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे. महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठे प्रमुख मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुकामाता अवतार म्हणजे आई एकवीरा देवी होय. आई एकवीरेच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी नेहमीच भाविकांची रीघ लागलेली पाहण्यास मिळते. परंतु, आता याठिकाणी येणाऱ्या महिला व पुरुष भाविकांसाठी ड्रेस कोड सक्तीचा करण्यात आला आहे. ड्रेस कोडचे पालन अनिवार्य असून, ड्रेस कोड नसेल तर भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे सचिव नवनाथ रामचंद्र देशमुख यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याची कुलस्वामिनी, आराध्य दैवत, तसेच जागृत स्थान असलेले व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान अर्थातच कार्ला गडावरील आई एकविरा देवी. कार्ला गडावरील पावित्र्य व मांगल्य राखण्यासाठी श्री आई एकविरा देवस्थान ट्रस्टच्यावतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ड्रेस कोड अनिवार्य करण्याचा निर्णय शुकव्रार, दि. 27 जून रोजी झालेल्या विश्वस्त मंडळाच्या सभेतमध्ये घेण्यात आला आहे. या सभेत प्रमुख विश्वस्त खा. सुरेश म्हात्रे, अध्यक्ष दिपक हुलावळे, वरिष्ठ उपाध्यक्ष मारुती देशमुख, उपाध्यक्ष सागर देवकर, सचिव नवनाथ देशमुख, सहसचिव महेंद्र देशमुख, खजिनदार संजय गोविलकर, सहखजिनदार विकास पडवळ, विश्वस्त पूजा पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, या निर्णयाची अंमलबजावणी सोमवार, दि. 7 जुलैपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवारपासून कार्ला गडावर आई एकविरा देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड अनिवार्य आहे. ड्रेसकोड नसेल तर मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे ही कळविण्यात आले आहे.
काय परिधान करावे?
महिलांनी व मुलींनी साडी, सलवार-कुर्ता किंवा इतर भारतीय पारंपरिक कपडे घालावे की, त्याने पूर्ण अंग झाकलेले असेल. तसेच, पुरुषांनी व मुलांनी धोतर, कुर्ता, पायजमा कुर्ता, पॅन्ट-शर्ट, टी-शर्ट किंवा इतर भारतीय पारंपरिक कपडे घालावेत जेणेकरुन त्याने पूर्ण अंग झाकलेले असेल.
काय टाळायचे?
शॉर्ट्स, शॉर्ट स्कर्ट, वेस्टर्न कपडे, मिनी स्कर्ट्स, रिप्ड जीन्स, फाटके जीन्स, हाफ पॅन्ट किंवा अंगप्रदर्शन करणारे कपडे, हे सर्व कपडे घालू नये. सर्व भाविकांनी, दुकानदारांनी तसेच स्थानिक मंडळींनी मंदिराच्या पावित्राचे जतन करण्यासाठी या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, असे आवाहन श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.
‘या' मंदिरांमध्ये ड्रेसकोड अनिवार्य
भारतातील प्रमुख मंदिरांमध्ये याआधीच भाविकांना ड्रेसकोड अनिवार्य करण्यात आले आहेत. त्यामध्ये केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिर, शिर्डीचे साईबाबा मंदिर, अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिर, कर्नाटक गोकर्ण येथील महाबळेश्वर मंदिर, आंध्रप्रदेशमधील तिरुपती बालाजी, कन्याकुमारी येथील कन्याकुमारी माता मंदिर, उज्जैनमधील महाकाल ज्योतिर्लिंग, छत्रपती संभाजीनगरमधील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिराचा समावेश आहे.
कार्ला गडावरील आई एकविरा देवस्थानचे पावित्र्य व मांगल्य अबाधित राहावे, यासाठी विश्वस्त मंडळाने सर्वानुमते हा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या भाविकांना सुखसोयी मिळाव्यात, त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठीदेखील गडावर सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयास भाविकांनी सहकार्य करावे.
नवनाथ रामचंद्र देशमुख, सचिव,
आई एकविरा देवस्थान ट्रस्ट, कार्ला






