वाहनचालकांसह ग्रामस्थ्यांचा जीव धोक्यात; नवीन पूल बांधण्याची मागणी
| पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील वाफेघर गावाला जोडणाऱ्या पूलाची अक्षरशः दैना झाली आहे. मुसळधार पावसामुळे या पुलावर खड्डे पडले असून, स्लॅबच्या सळ्या देखील बाहेर आल्या आहेत. पुलाला संरक्षण कठडे देखील नाहीत. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी किंवा या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
येथील नदीचा पाण्याची पातळी वाढल्यास वाफेघर गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी जाते. त्यामुळे येथील वाहतूक ठप्प होते. शिवाय पुल जोड रस्त्याजवळ खचला आहे. मागील वर्षी मुसळधार पावसामुळे या पुलाच्या जोड रस्त्याचा काही भाग वाहून गेला होता. तसेच, तेथे मोठा रुंद खड्डा पडून दगडगोटे बाहेर आले होते. ग्रामस्थांनी एकत्र येऊन या ठिकाणी तात्पुरती दुरुस्ती केली होती. या पुलावरून परिसरातील नागरिक, शेतकरी, चाकरमानी तसेच विद्यार्थी सातत्याने प्रवास करीत असतात. काही वर्षांपूर्वी येथील नदीच्या पात्रावर पूल बांधण्यात आल्याने येथील प्रवास सुखकारक झाला होता. मात्र, आता हा पूल शेवटची घटका मोजत आहे. मात्र, संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. धोकादायक पुलामुळे जर एसटी बस गावात यायची बंद झाली तर विद्यार्थी, गावकरी, चाकरमानी व छोटे-मोठे व्यवसाय यांचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच, हा पूल धोकादायक झाल्याने खासगी वाहनचालक देखील येथून जाण्या-येण्यास कचरतात. त्यामुळे या पुलाची डागडूजी करून याच ठिकाणी नवीन पुलाची बांधणी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
वाफेघर पूल गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीची वाट पाहात आहे. मात्र, आजतागायत या पुलाची दुरुस्ती झालेली नाही. सद्यस्थीतीत पुलाची अवस्था दयनीय झाली आहे, तो कधीही कोसळू शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने या धोकादायक पुलाचे गांभीर्य लक्षात घेत हा पुल नव्याने बांधण्यात यावा.
राकेश बेलोसे,
ग्रामस्थ
वाफेघर पुलाची दयनीय अवस्था झाली असून, त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पुढे पाठविण्यात आलेला आहे.
गुलाबराव देशमुख,
शाखा अभियंता बांधकाम पंचायत समिती पाली







