| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या परिसरात बहुतांश नामांकित विद्यालये आणि महाविद्यालये आहेत. त्याचमुळे येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मला आनंद होत आहे, असे प्रतिपादन शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केले. खारघरमधील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा शनिवारी (दि.28) येथील उत्कर्ष सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमात खारघरमधील इंग्रजी माध्यमाच्या शाळा, सीबीएससी बोर्ड, मराठी माध्यमाच्या शाळा आणि महाविद्यालयातून प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. सुनील धापटे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी सांगितले की, पालकांनी मुलांवर कोणतेही बंधन न लादता त्यांची आवड कशामध्ये आहे हे लक्षात घेऊन त्यांना प्रोत्साहन द्यावे, जेणेकरून ते त्या कलेमध्ये प्राविण्य मिळवतील. विद्यार्थ्यांनी आपल्या कामाचे योग्य रीतीने नियोजन केले तर यश हे त्यांना हमखास मिळेलच, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पनवेल कृउबा समितीचे सभापती नारायण घरत, पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शिरीष घरत, कृउबा समितीचे माजी सभापती डॉ. दत्तात्रय पाटील, कृउबा समितीचे संचालक देवेंद्र मढवी, शेकाप जिल्हा महिला सहसचिव तेजस्विनी घरत, माजी आमदार दत्तू पाटील, शिक्षण संस्थेचे सीईओ रा.गो. पाटील, खारघर शहर अध्यक्ष अशोक गिरमकर व नरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.







