पुण्याच्या पर्यटकांना अगाऊपणा नडला
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील आरावी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या पुण्याच्या पर्यटकांनी आगाऊपणा करून गाडी समुद्रकिनारी उतरवली. यावेळी गाडीच्या टपावर चढून कोण सेल्फी काढत होता, तर काहीजण रील बनवत होते. दरम्यान, दुपारी 12.00 वाजताच्या सुमारास समुद्राला पूर्ण भरती येणार होती. मात्र, या पर्यटकांना सेल्फी काढण्यात आणि रील बनवण्यात समुद्राचे पाणी गाडीजवळ येऊन पोहोचल्याचे भान राहिले नाही. त्यानंतर 15 ते 20 मिनिटांमध्ये गाडीच्या खाली समुद्राचे पाणी आल्यामुळे पर्यटकांनी गाडी काढण्याचा प्रयत्न केला असता, गाडीची चाके गोल फिरू लागली आणि गाडी आत रूतत गेली. भरतीची वेळ असल्यामुळे समुद्राचे पाणी वाढतच गेले. समुद्राला पूर्ण भरती आल्यानंरत गाडीमध्ये पाणी शिरले. त्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जेसीबी वाल्याला पाचारण केले. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली. दरम्यान, सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जागोजागी “गाडी किनाऱ्याजवळ नेऊ नये किंवा समुद्र खवळलेला असल्यामुळे पर्यटकांनी देखील समुद्रस्नानासाठी जाऊ नये”, अशा आशयाचे फलक लावलेले आहेत. असे असतानाही अतिउत्साही पर्यटकांकडून अशा प्रकारच्या घटना नेहमीच घडत असतात. या घटनेची तातडीने दखल घेऊन अति उत्साही पर्यटकांवर प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.




