सुकी मासळी झाली स्वस्त, खवय्यांची चंगळ

अनेकांची मासळी खरेदी व साठवण करण्याची लगबग सुरु
। पाली/बेणसे । धम्मशील सावंत ।
सध्या ओल्या मासळीची मुबलक मासेमारी, त्यामुळे सुकविण्याचे प्रमाण अधिक झाले असून, सुक्या मासळीची आवक वाढली आहे. यामुळे जिल्ह्यात मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात सुक्या मासळीचे दर घटले आहेत. दोन हजार ते 2200 रुपये किलोने मिळणारे सोडे आता 1600 ते 1800 रुपये किलोने मिळत आहेत. तर, 1600 रुपये किलोने मिळणारे सोडे 1200 रुपये किलोने मिळत आहेत. सुकट, वाकटी, बोंबील आदींच्या किंमतीदेखील 100 ते 150 रुपये प्रतिकिलोने घटल्या आहेत. त्यामुळे खवय्यांची चंगळ होत आहे.
या दिवसांत अनेकांची सुकी मासळी खरेदी व साठवण करण्याची लगबग सुरु आहे. आणि सुक्या मासळीची आवक वाढल्यामुळे व किंमत उतरल्याने तर खरेदीची धावपळ सुरू आहे. सध्या जिल्ह्यातील आठवडा बाजार व मासळी बाजारात सुकी मासळी खरेदीसाठी रेलचेल दिसत आहे. जिल्ह्यात येणारे पर्यटकदेखील आवर्जून सुकी मासळी खरेदी करून नेताना दिसत आहेत. लॉकडाऊनच्या भीतीनेदेखील काही जण सुक्या मासळीचा साठा करीत आहेत. मागील महिन्यात खराब हवामान व अवकाळी पाऊस यामुळे खोल समुद्रातील मासेमारी कमी झाली होती. त्यामुळे अगदी कमी प्रमाणात मासळी सापडत होती. सापडलेली मासळी ताजी विकण्यावर मच्छिमारांचा कल होता. मात्र, आता मासेमारी जोरात सुरू झाली असून, मोठ्या प्रमाणात मासे सापडत आहेत. मग हे मासे सुकविण्याकडे कल दिसत आहे.

Exit mobile version