पिण्याच्या पाण्यासाठी धानसर गावातील नागरिकांची परवड
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पालिकेच्या माध्यमातून स्मार्ट व्हिलेज म्हणून घोषित करण्यात आलेल्या धानसर गावातील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी परवड सुरु आहे. पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी महिलांना डोक्यावर हंडा घ्यावा लागत असून, उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पातळी खालावल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध असलेल्या नळावर तासन्तास रांगा लावून बसण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, पाण्याच्या पातळीत घट होत आहे. अशातच पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल आणि विहिरीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई भासत आहे. पनवेल पालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधील धानसर गावाचा समावेश स्मार्ट व्हिलेज योजनेत करण्यात आला होता. कालांतराने पालिकेची अशी कोणतीच योजना नसल्याचे सांगत मूलभूत सोयीसुविधा पुरवणारी योजना म्हणून या योजनेचे नामकरण पालिकेच्यावतीने करण्यात आले होते. या योजनेद्वारे गावाला मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्न करेल, असे घोषित करण्यात आल्यानंतरसुद्धा अपेक्षित पाणीपुरवठा करण्यात पालिका अपयशी ठरल्याने गावातील नागरिक सध्या पाणीटंचाईचा सामना करत आहेत. नळपाणी योजना अस्तित्वात नसलेल्या या गावातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेल आणि विहिरीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. येथील नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे याकरिता पालिकेच्या माध्यमातून जवळपास 8 लाख रुपये खर्चून पाणी शुद्ध करणारी यंत्रणा उपलब्ध करुण देण्यात आलेली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गावातील नागरिक या यंत्रणेद्वारे शुद्ध केलेल्या पाण्यावर अवलंबून आहेत. पाणीपातळी घटल्याने यंत्रणेद्वारे मिळणार्या पाण्यातदेखील घट झाल्याने या ठिकाणी शुद्ध पाणी मिळवण्यासाठी नागरिकांची परवड होताना पाहायला मिळत आहे.
बोअरवेलद्वारे उपसण्यात आलेले पाणी दहा हजार लीटर पाणीसाठा करणार्या टाकीत साठवले जाते. त्यानंतर पालिकेद्वारे बसवण्यात आलेल्या आरो सिस्टीमद्वारे प्रक्रिया करुन एक हजार लीटरच्या दोन टाक्यांमध्ये सोडण्यात येते. त्यानंतर हे पाणी या ठिकाणी उपलब्ध असलेल्या दोन नळांद्वारे नागरिकांना पुरवण्यात येते. या प्रक्रियेदरम्यान हजारो लीटर अशुद्ध पाणी वाया जात असल्याने आधीच कमी झालेले पाणी आणखीनच कमी पडत आहे.
वेगळे झालेले अशुद्ध पाणी साठवणूक करण्यासाठी याच ठिकाणी खड्डा खोदल्यास पाणी पुन्हा जमिनीत झिरपून बोअरमधील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे पालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी खड्डा खोदून पाणीसाठा करण्यासाठी टाकी तयार करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती भाजपा पदाधिकारी जितेंद्र पोरजी यांनी पालिकेकडे केली आहे.
टँकरद्वारे केला जातो पुरवठा
पालिकेच्या माध्यमातून धानसर गावात मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, या ठिकाणी पाणीसाठा करण्यासाठी उपलब्ध असलेल्या टाकीत टँकरचे पाणी भरण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने टँकरच्या पाण्याचा कोणताही फायदा ग्रामस्थांना होत नाही.
उन्हाळ्यात पाणीपातळी घटत असल्याने मागणीनुसार गावाला टँकरच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.
– विलास चव्हाण, अधिकारी, पाणीपुरवठा विभाग
गावातील नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरेशा प्रमाणात मिळावे, हीच ग्रामस्थांची अपेक्षा असून, पालिका प्रशासनाने याकरिता प्रयत्न करणे अपेक्षित आहे.
– सुरेंद्र जाधव, ग्रामस्थ