विनयभंग करणाऱ्या चालकाला सक्त मजुरी

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

मोठा खांदा सेक्टर 18 येथील सागर चव्हाण हे स्कूल व्हॅनवर चालक म्हणून काम करत होते. त्यावेळी एक दहा वर्षीय पीडित मुलगी चालकाच्या मागच्या सिटवर बसली होती. त्यानंतर चालकाने तिला पुढील सीटवर बसायला सांगितले आणि तिच्यासोबत गैर कृत्य केले. हा प्रकार तिच्या आई-वडिलांना समजल्यानंतर चालकाविरुद्ध खांदेश्वर पोलीस ठाण्यात 2023 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचे दोषारोप पत्र न्यायालयात सादर करण्यात आले आणि पनवेल येथील विशेष न्यायालयात या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. विशेष सरकारी वकील प्रतीक्षा वडे-वारंगे यांनी सरकारी पक्षातर्फे काम पाहिले. यावेळी सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडिता व पीडीतेचे वडील यांच्यासह तपासीक अधिकारी एपीआय अमोल खाडे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. विशेष सरकारी वकील प्रतीक्षा वडे- वारंगे यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सागर चव्हाण याला शिक्षा सुनावली. त्याला पोक्सो कायदा कलम आठ अन्वये 3 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि 5 हजार रुपये दंड, तसेच पोक्सो कायदा कलम 10 अन्वये 5 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.

Exit mobile version