| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
गणेशोत्सवासाठी आपल्या लाडक्या गणरायाच्या भेटीला जाण्यासाठी कोकणातील चाकरमान्यांनी गावची वाट धरली आहे. त्यामुळे पनवेल रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण मार्गावर रेल्वे प्रशासनाकडून अनेक विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र, विशेष गाड्यांची संख्या वाढवूनही कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी कमी होताना दिसत नाही. गावी जाऊन गणपती बाप्पाचे स्वागत करण्यासाठी कुटुंबासह प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. स्थानकातील फलाटांवर सकाळपासूनच प्रवाशांची लगबग सुरू असून, रेल्वे येताच गावी जाण्यासाठी प्रवाशांची धावपळ होत आहे. अनेक कुटुंबांनी आधीच आरक्षण केले असले, तरी तातडीच्या प्रवासासाठीही नागरिक स्थानकात गर्दी करत आहेत. गणरायाच्या आगमनाची उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत आहे. शहरात नोकरी-व्यवसायानिमित्त राहणारे चाकरमानी वर्षभरानंतर आपल्या गावातील गणेशोत्सवासाठी मोठ्या उत्साहाने रवाना होत आहेत. कोकणातील घराघरांत बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू झाली असून, आपल्या लाडक्या गणरायासोबत कुटुंबीयांना भेटण्याची ओढ चाकरमान्यांना गावाकडे घेऊन जात आहे. त्यामुळे पनवेल रेल्वे स्थानकावर सध्या ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषासह कोकणच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.





