वाहन चालकांनो जरा जपून….

हजारो सापांचा वाहनांखाली चिरडून हकनाक बळी
। पाली/बेणसे । धम्मशील सावंत ।

पावसाळा नुकताच सुरु झाला आहे. या हंगामात साप, सरडे इत्यादी सरपटणारे प्राणी भक्ष्य शोधत बाहेर फिरतात. खाद्य गोळा करण्यासाठी त्यांच्या हालचाली वाढत आहेत. मग बर्‍याच वेळा हे प्राणी रस्त्यावर येऊन वाहनांखाली चिरडुन त्यांचा मृत्यु होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या जिल्ह्यात असा प्रकारच्या घटना रोज विविध ठिकाणी शेकडोच्या संख्येने घडत आहेत. यामुळे हजारो सापांचा जीव जात आहे. परिणामी त्याच्या संख्येत लक्षणीय घट होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळण्याची व काही प्रजाती कमी होण्याची शक्यता आहे. याबाबत पर्यावरण प्रेमींकडुन चिंता व्यक्त केली जात आहे.


साधारणतः दिवड, धामण, नानेटी, घोणस, तस्कर, मांजर्‍या, नाग, मण्यार इत्यादी व काही दुर्मिळ सापांचा रस्त्यावर चिरडून अधिक प्रमाणात मृत्यू होत आहे. शेतकर्‍यांसाठी सुद्धा हे प्राणी अधिक महत्त्वाचे आहेत. विशेषतः साप तर शेतकर्‍यांचा मित्रच आहे. हे सर्व सरपटणारे प्राणी आपल्या पर्यावरणाचे आणि संबंधीत परिसंस्था अबाधित ठेवण्याचे काम करतात. अन्नजाळी आणि अन्न साखळीत या प्रत्येक प्राण्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. यातील एक जरी प्राणी विलुप्त झाला तर अन्नजाळी आणि अन्न साखळी खंडित होऊन पर्यावरचा समतोल बिघडू शकतो.


साप उपद्रवकारक उंदरांना खातो. तसेच सरडे आणि बेडूक हे पिकांवरील किटक व कृमी खातात त्यामुळे शेतीचे नुकसान टळते. रायगड जिल्हा हा निसर्ग सोंदर्याने नटलेला असुन येथे विविध प्रकारची जैवविविधता आढळते. येथील बहुतांश रस्ते हे जंगलातुनच जातात. साप, सरडे, बेडूक यांच्या प्रजननाचा हंगाम असल्याने या प्राण्यांची हालचाल वाढत आहेत. प्रामुख्याने रात्रीच्या व पहाटेच्या वेळी अधिक हालचाली असतात. तसेच खाद्दय मिळविण्यासाठीही त्यांना फिरावे लागते दरम्यान हे प्राणी रस्त्यावर येतात आणि वाहनांखाली चिरडुन मरतात. वाहनचालकांसमोर अचानक आल्याने त्यांना कधीकधी नाईलाजाने या प्राण्यांवरून गाडी न्यावी लागते. हे प्राणी निसर्गाचा समतोल राखण्यास महत्वपूर्ण भुमिका बजावतात. जर वाहनचालकांनी योग्य सावधानता बाळगत सुरक्षितपणे वाहन चालविल्यास या प्राण्यांचा जिव वाचू शकतो असे मत अनेक पर्यावरण प्रेमींनी मांडले आहे

वाहने चालवा जपून
पर्यावरणाचे संतुलन राखण्यास साप, बेडूक व सरडे या प्राण्यांचे खुप मोठे योगदान आहे. या हंगामात वाहनांखाली चिरडुन अनेक साप व सरडयांचा मृत्यु ओढावतो. त्यामुळे या कालावधीत वाहनचालकांनी खबरदारी घेऊन अधिक दक्ष राहुन वाहन चालविणे गरजेचे आहे. या बाबत अधिक जनजागृती होणे आवश्यक आहे. असे अवाहन निसर्ग प्रेमी संस्थांनी केले आहे. सोशलमीडियातून देखील याबाबत काही प्रमाणात जनजागृती होत आहे.

हे सरपटणारे प्राणी पर्यावरणासाठी अधिक मौलिक आहेत. आपल्या घरात, लोकवस्तीत किंवा औद्योगिक क्षेत्रात कोणताही साप आढळल्यास घाबरुन न जाता त्याला दुखापत न करता जवळील सर्प मित्रास बोलावणे आवश्यक आहे. घराबाहेर किंवा मोकळ्या जागेत साप असल्यास त्याला न घाबरवता वाट मोकळी करुन द्यावी. रस्त्यावर साप किंवा सरडे सापाला आपण स्वतः काही दुखापत किंवा डिवचल्या शिवाय तो आपल्याला काही करत नाही.

तुषार केळकर, सर्पमित्र
Exit mobile version