| खांदा | वार्ताहर |
पनवेल सेक्टर 20, तक्का येथून पनवेलमार्गे नवीन पनवेलकडे जाणाऱ्या रस्त्याची गेल्या काही दिवसांपासून खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले असून, रस्त्यावरून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.
खडीच्या ढिगाऱ्यातून मार्ग काढताना अनेक दुचाकीस्वारांचा तोल जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही दुचाकीस्वारांनी तर वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून काही अंतर पायी चालणे पसंत केले. विशेषतः लहान मुलांना घेऊन जाणाऱ्या पालकांना या मार्गावरून जाताना अधिक सावधगिरी बाळगावी लागत होती. हा रस्ता दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा असून, पनवेल आणि नवीन पनवेलदरम्यान ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. अशा वर्दळीच्या रस्त्यावर खडी टाकण्याचे काम सुरू असताना आवश्यक ती वाहतूक व्यवस्था करण्यात आली नसल्याची चर्चा वाहनचालकांमध्ये होती.
कामाच्या ठिकाणी ठेकेदाराने संपूर्ण यंत्रणा आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध ठेवणे गरजेचे होते, अशी प्रतिक्रिया काही वाहनचालकांनी व्यक्त केली. काम सुरू असताना प्रशासनाचा अधिकारी किंवा संबंधित विभागाचा प्रतिनिधी प्रत्यक्ष ठिकाणी का उपलब्ध नसतो, असा सवालही वाहनचालकांकडून उपस्थित करण्यात आला. खडी आणि अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे दुचाकीस्वारांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे कामाच्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, या मार्गावरील खड्ड्यांमुळे यापूर्वीही वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. आता खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात झाल्याने वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी कामाचा दर्जा आणि रस्ता किती दिवस टिकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रस्त्यात खडी पसरल्याने वाहनचालकांची कसरत
