मोकाट गुरांमुळे वाहनचालक त्रस्त

वाहतुक कोंडीची समस्या

| पाली-बेणसे | वार्ताहर |

शिहू-नागोठणे-पोयनाड रस्त्यावर ठिय्या मांडून बसणारी व रास्ता रोको करणारी मोकाट गुरे प्रवाशी, वाहनचालक व नागरिकांसमोर डोकेदुखी ठरत आहे. हा मार्ग वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावरुन सातत्याने वाहनांची वर्दळ सुरु असते. आजवर रस्त्यातील जिवघेण्या खड्ड्यांमुळे हा मार्ग नेहमीच चर्चेत राहिला आहे. अशातच या मार्गावर मोकाट गुरांचा सातत्याने जणू रास्ता रोको होत असल्याने वाहनचालकांसह प्रवाशी अक्षरशः हैराण झाले आहेत.

मोकाट गुरांचे जथ्थे दिवसा व रात्री या मार्गाच्या मधोमध ठाण मांडत असल्याने जीवघेण्या अपघाती घटनांना निमंत्रण मिळत आहे. या मार्गावर रस्त्यात बसलेल्या गुरांना धडकून अनेकदा अपघाती घटना घडल्या आहेत. त्यामुळे गुरे मालकांनी आपापली गुरे मोकळी न सोडता त्यांची योग्यप्रकारे निगा राखावी, अशी मागणी प्रवाशी व वाहनचालकांमधून जोर धरत आहे. या मार्गावरील मोकाट गुरांची वाढती समस्या डोकेदुखी ठरत आहे. भररस्त्यात ही गुरे ठाण मांडून बसत असल्याने वाहतुक कोंडीची समस्या देखील निर्माण होताना दिसत आहे.

रात्रीच्या वेळी मोटारसायकलस्वार व वाहनचालकांना रस्त्यात बसलेली गुरे दिसत नसल्याने अनेकदा अपघाती घटना घडल्या आहेत. तसेच, अवजड वाहनांच्या धडकेत गुरांचा बळी जाण्याची देखील शक्यता असते. अशातच वाहनचालकांनी कितीही हॉर्न वाजविला तरी मोकाट गुरे जागेची हालत नसल्याने यातून वाट कशी काढायची, असा प्रश्न वाहनचालकांसमोर उभा राहत आहे.

मोकाट जनावरे रस्त्यावर येत असल्यामुळे वाहनचालकांना अडथळा येतो. रात्रीच्या वेळी रस्त्यावरील मोकाट जनावरे न दिसल्यामुळे बऱ्याचदा अपघात होतात. तसेच, मोठ्या वाहनांची धडक लागून गुरे देखील मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे मोकाट फिरणाऱ्या या जनावरांना गुरे मालकांनी गुरे मोकाट सोडू नये. त्यांची चारापाण्याची व्यवस्था योग्य ठिकाणी करण्यात यावी.

नियमीत प्रवाशी
Exit mobile version