40 मद्यधुंद चालकांना न्यायालयाची वारी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
वाहतूक नियमांचे उल्लंघन करत दारूच्या नशेत वाहन चालविणे अनेकांना महागात पडले असून, तब्बल 40 चालकांना न्यायालयाची पायरी चढावी लागली आहे. रायगड जिल्हा वाहतूक शाखेने जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यांच्या कालावधीत ही कारवाई करत बेशिस्त वाहनचालकांना चांगलाच दणका दिला आहे.
रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत असून, येथे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. समुद्रकिनारे तसेच विविध पर्यटनस्थळांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची विशेषतः सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होत असते. विविध राज्यांतील पर्यटकांसह स्थानिक नागरिकदेखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ये-जा करत असतात. मात्र, काही वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे चित्र दिसून येते. हेल्मेटचा वापर न करणे, अतिवेगाने वाहन चालविणे, वाहनात जादा प्रवासी घेणे, परवाना नसताना वाहन चालविणे, तसेच दारू पिऊन वाहन चालविणे अशा प्रकारच्या नियमभंगाच्या घटना सातत्याने आढळून येतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा वाहतूक शाखेकडून दररोज विशेष मोहिमा राबवून बेशिस्त चालकांवर कारवाई केली जाते. विशेषतः दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात कठोर पावले उचलली जात असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत आहे.
जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत अशा 40 चालकांविरोधात कारवाई करण्यात आली असून, सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या कारवाईत स्थानिकांसह बाहेरून आलेल्या पर्यटकांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. वाहतूक पोलिसांच्या या कारवाईमुळे मद्यधुंद चालकांवर आळा बसण्यास मदत होत असल्याचे चित्र आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरोधात दररोज नियमित कारवाई केली जात आहे. विशेषतः दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करून त्यांना न्यायालयात हजर केले जात आहे. आतापर्यंत 40 चालकांवर अशी कारवाई करण्यात आली आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविल्यास अपघात होण्याची शक्यता अधिक असते. संभाव्य अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही कारवाई करण्यात येत आहे.
सरिता चव्हाण,
पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा, रायगड
