| अलिबाग | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत पोयनाड हद्दीतील भाकरवड गावचे रहिवासी जीवन दत्तात्रेय पाटील यांना जिल्हास्तरीय द्रोणागिरी भूषण पुरस्कार शुक्रवार, दि. 20 डिसेंबर रोजी प्रदान करण्यात आला. उरण येथील द्रोणागिरी युवा महोत्सवानिमित्त कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
जीवन दत्तात्रेय पाटील हे सन 2008 पासून मनस्वी मानव सेवेच्या माध्यमातून वारस-बेवारस मृतदेहांची विनामूल्य सेवा करत आहेत. त्यांनी आजपर्यंत 103 मृतदेहांची पोलिसांच्या सहकार्याने विल्हेवाट लावली आहे. कोणताही अपघात झाला की जीवन पाटील त्यांच्याकडील असलेली रुग्णवाहिका घेऊन तात्काळ अपघातस्थळी जाऊन मदतकार्य करतात. आजपर्यंत 150 हून अधिक अपघातग्रस्तांचे प्राणही त्यांनी वाचविले आहेत. पोयनाड येथील पेझारी चेक पोस्ट येथे त्यांनी रुग्णवाहिका सेवेसाठी ठेवली आहे. ती गरीब गरजू लोकांना कधीही उपलब्ध होत आहे.
जीवन पाटील यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत रायगडभूषण, जीवन गौरव, समाज भूषण, समाजरत्न, ग्रीन फाऊंडेशन ग्रीन वर्ल्ड, पोयनाड भूषण, ज्ञानसंकल्प पुणे जीवन गौरव, लोकसेवा आयोग कोल्हापूर आदर्श कार्य गौरव पुरस्कार, कुशल नेतृत्व जननायक, श्रमजिवी जीवन गौरव पुरस्कार, आदर्श समाज भूषण, लहुजी शक्तिसेना कोविड योद्धा पुरस्कार, महात्मा ज्योतिबा फुले समयदूत पुरस्कार, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सन्मान अशा एकूण 58 पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांना द्रोणगिरी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्याबद्दल त्यांच्यावर अनेक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.